September 17, 2024

Samrajya Ladha

सिंबायोसिस व क्रेडाई महाराष्ट्र तर्फे बांधकाम क्षेत्रात प्रथमच प्रमाणित अभ्यासक्रम सुरू होणार

पुणे :

“बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तरुण पिढीने केवळ पारंपारिक व्यवसाय पद्धतीत अडकून न राहता कालसुसंगत ज्ञान प्राप्त करावे व व्यावसायिक व्यवस्थापनावर भर देत ग्राहकांना दर्जेदार सेवा प्रदान कराव्यात “ या हेतूने क्रेडाई महाराष्ट्र तर्फे “सिंबायोसिस सेन्टर फॉर कॉर्पोरेट एज्युकेशन, पुणे” या संस्थेशी भागीदारी करून प्रथमच प्रमाणित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

यावेळी सचिव विद्यानंद बेडेकर, वुमेन विंगच्या निमंत्रक सीए श्वेता भारतीया, सह निमंत्रक प्रणिती श्रॉफ, युथ विंगचे निमंत्रक संकेत तुपे यांसह डॉ. सीमा सिंग, संचालिका, सिंबायोसिस सेंटर फॉर कॉर्पोरेट एज्युकेशन, पुणे व डॉ. स्वाती येरवडेकर, प्रमुख, एमबीए (कार्यकारी), सिंबायोसिस सेंटर फॉर कॉर्पोरेट एज्युकेशन, पुणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना खैरनार पाटील म्हणाले की, विकासकांना बांधकाम क्षेत्रातील सर्वांगीण व्यावसायिक कौशल्ये प्रदान करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. क्रेडाई महाराष्ट्राच्या युवाशक्तीने अर्थात युथ विंग आणि वुमेन विंगने एकत्रित येऊन डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका सिंबायोसिस व प्र- कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली ही संकल्पना पुढे आणली आहे. जागतिक ख्याती असणाऱ्या सिंबायोसिस या शैक्षणिक संस्थेने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सिंबायोसिस सेन्टर फॉर कॉर्पोरेट एज्युकेशन, पुणे तर्फे सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल असे देखील खैरनार पाटील यांनी सांगितले.

डॉ. सीमा सिंग, संचालिका, सिंबायोसिस सेंटर फॉर कॉर्पोरेट एज्युकेशन, पुणे यांनी या वेळी बोलताना नमूद केले की, एकूण ६ महिन्यांचा हा अभ्यासक्रम ४८ सत्रात पार पडेल. येत्या २५ ऑगस्टपासून या अभ्यासक्रमाची सत्रे सुरु होतील. दूरस्थ (ऑनलाईन) आणि प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन (ऑफलाईन) अशा एकत्रित पद्धतीने शिक्षण दिले जाईल. यासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी क्रेडाई सदस्य असणे बंधनकारक असेल. यासाठी वयाची कोणतीही अट नसेल. बांधकाम व्यवस्थापनाचा परिचय, बांधकाम व्यवसाय व्यवस्थापन, व्यवसाय नियोजन आणि विपणन, व्यवसायाचे आर्थिक पैलू, व्यावसायिक पद्धती आणि बांधकाम कायदा आणि मानव संसाधन व्यवस्थापन अशा एकूण ६ विषयांचा अभ्यासक्रम यात समाविष्ट असेल. सदर अभ्यासक्रम हा “मूल्यांकनावर आधारित व्यवस्थापन विकास कार्यक्रम” असल्याने विद्यार्थ्यांचे “Continuous Assessment” केले जाईल.रिअल इस्टेट बिझनेस एनहान्समेंट (Real estate business enhance ment) असे त्या कोर्सचे नाव आहे.

बेडेकर म्हणाले की, क्रेडाई महाराष्ट्र संस्था कायमच व्यावसायिक आणि सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते. परंतु, बांधकाम क्षेत्रातील तरुणांसाठी सिंबायोसिस सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबर असा शैक्षणिक उपक्रम घेऊन येणारी आमची ही पहिलीच संस्था आहे. कार्यक्षेत्र कोणतेही असले तरीही आशयसमृद्ध, व्यवहार कुशल, कौशल्याधिष्ठित शिक्षण ही काळाची गरज झाली आहे. हे ओळखून क्रेडाई महाराष्ट्राने हा उपक्रम राबविला आहे. विकसकांना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वोत्तम व दर्जेदार ज्ञान मिळावे. त्या ज्ञानाचा, अनुभवाचा व्यापक दृष्टीने बांधकाम क्षेत्राला लाभ व्हावा, असाही यामागील हेतू आहे. सध्या मर्यादित आणि पथदर्शी स्वरूपात हा उपक्रम आम्ही राबवत असलो तरी याला भविष्यात मिळणारा प्रतिसाद बघून मोठ्या प्रमाणात हा शैक्षणिक उपक्रम पुढे नेण्याचा आमचा मानस आहे. तरी, व्यवसायाभिमुख कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमाचा अधिकाधिक सदस्यांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.