बालेवाडी :
श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचा ३८ वा वर्धापन दिन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी लोकमतचे संपादक श्री. संजय आवटे यांनी “उत्तम माणूस बनवणारे शिक्षण हवे” यावर भर दिला. भविष्यात तुम्ही काय बनणार आहात याआधी तुम्हाला उत्तम माणूस म्हणून आयुष्य जगण्याची कला अवगत झाली पाहिजे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
संस्थेची वाटचाल: के.जी. ते पी.एच.डी.
१९८८ साली मुलींना पुढील शिक्षणासाठी बालेवाडीबाहेर जाऊन शिक्षण घेणे आव्हानात्मक होते, हे ओळखून श्री. अप्पासाहेब बालवडकर यांनी स्वतःच्या राहत्या घरात या शाळेची सुरुवात केली होती. आज हा छोटासा रोपाचा वटवृक्ष झाला असून, श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्था के.जी. ते पी.एच.डी. पर्यंतच्या शिक्षणाची ओळख बनली आहे. संस्थेमध्ये बी.बी.ए., बी.सी.ए., बी.कॉम., एम.सी.ए., पी.एच.डी., बी.एड. यांसारख्या उच्च शिक्षण अभ्यासक्रमांबरोबरच मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळाही सुरू आहेत.
सर्वांगीण विकासाला प्राधान्य
संस्थेचे सचिव आणि शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीचे व्यक्तिमत्व डॉ. सागर बालवडकर यांनी सांगितले की, संस्था कला, क्रीडा आणि पाठ्यपुस्तकांचा योग्य समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यात त्यांना भरभरून यश मिळत आहे. शिकण्यास प्रवृत्त करणारे शिक्षक, उत्तम सोयी-सुविधा, विविध खेळांची आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने आणि त्यातील तज्ञ शिक्षक ही संस्थेची ओळख आहे. विद्यार्थी घडला की शिक्षक आणि शिक्षणाचा दर्जा सिद्ध होतो, असेही डॉ. बालवडकर यांनी नमूद केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गौरव
या प्रसंगी अभ्यास, विविध कला-क्रीडा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. आवटे यांनी आपल्या प्रभावी वाणीकौशल्याने उपस्थित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मंत्रमुग्ध केले. आयुष्याकडे आनंदी वृत्तीने पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन शाळांमध्येच विकसित झाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कला, क्रीडा आणि पाठ्यपुस्तके यांचा योग्य समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे त्यांनी विशेष कौतुक केले.
संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा: नॅक मान्यता
या वर्षी श्री मार्तंड भैरव अध्यापक महाविद्यालय आणि ज्ञानसागर कला व वाणिज्य महाविद्यालय यांना मिळालेली ‘नॅक’ची मान्यता ही एस.के.पी. कॅम्पसच्या शिरपेचातील तुरा असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अप्पासाहेब बालवडकर यांनी सर्व शिक्षक वृंदाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्राचार्य श्री. डफळ यांनी संस्थेबद्दल आणि संस्थापक अध्यक्षांच्या कार्याची माहिती दिली, तर पर्यवेक्षक लोहोकारे यांनी क्रीडा आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका स्वाती धर्माधिकारी यांनी केले. कार्यक्रमाला बालेवाडी विमेन्स क्लबच्या संचालिका प्रा. सौ. रूपालीताई बालवडकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सी.एम. इंटरनॅशनलच्या वतीने आभार प्रदर्शन करण्यात आले.
More Stories
पेरिविंकल स्कूल, पिरंगुटच्या कृष्णा भारतीचे कराटे मध्ये दमदार प्रदर्शन!
बालेवाडीतील श्री खंडेराय प्रतिष्ठानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! आप्पासाहेब बालवडकर यांना “महाराष्ट्राचे अनमोल रत्न” पुरस्कार प्रदान
औंध, बालेवाडी व खडकी परिसरात चोरीच्या वाढत्या घटनांवर तात्काळ कारवाई करण्याची माजी नगरसेवक सनी निम्हण यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी