नाशिक :
नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांसमोर सायबर आणि आर्थिक स्वरूपाच्या गुन्हेगारीची आव्हाने असल्याने ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक सत्र क्रमांक १२२ च्या दीक्षांत संचलन कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, राहुल ढिकले, पोलीस महासंचालक रजनिश सेठ, अप्पर पोलीस महासंचालक राजेश व्हटकर, डॉ. अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आगामी काळ हा आव्हानांचा असून रस्ते गुन्हेगारी सोबतच सायबर आणि आर्थिक गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी या प्रशिक्षण प्रबोधिनीतून चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळाले आहे. या प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे पोलीस उपनिरीक्षक हे देशसेवेत आपले कर्तव्य बजावताना नेहमीच अग्रस्थानी असतात. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून प्रतिष्ठेसोबतच समाजाप्रती निष्ठा बाळगून आपली व देशाचीप्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. लोकांच्या सेवेकरीता आपण पोलीसदलात रूजू झालो आहोत. शिस्तीत काम करीत असताना संवेदनशील राहिल्यास आपण कर्तव्यास निश्चितपणे न्याय देवू शकाल. समाजात गुणवत्तापूर्ण सेवेची संधी आपल्याला मिळाली आहे. या संधीच्या माध्यमातून आपण आपल्या कामाने, जनतेची शाबासकी मिळविणे हेच आपल्या जीवनातील महत्वपूर्ण पदक असेल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजातील चांगल्या प्रवृत्तीचे रक्षण करून वाईट प्रवृत्तींचा बिमोड करणे ही आपली आद्य जबाबदारी आहे. भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना समान दर्जा दिला असून कर्तव्य पार पाडताना कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता भारतीय संविधानाची घेतलेली शपथ निभावण्यासाठी कायम प्राधान्य द्यावे. त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज रहावे.
पोलीस महासंचालक रजश्रीश सेठ आपल्या मागर्दशनात म्हणाले की, प्रशिक्षणार्थी आज आपले प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस सेवेत रूजू होणार आहेत. समाजातील वंचित आणि शोषित घटकास समान न्याय आणि संरक्षण देणे ही आपली महत्वाची जबाबदारी आहे. अवैध वाळू उपसा, अंमली पदार्थ या सारख्या असामाजिक गुन्हेगारीवर आपला अंकुश असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नागरिकांप्रती आपली वर्तणूक सद्भावपूर्ण असावी. गुन्ह्याचा तपास कायद्याला अभिप्रेत असलेल्या प्रक्रियेनुसार होणे अपेक्षित आहे.
शिरूर तालुक्यातील निमुणे येथील अभिजित भरत काळे हा १२२ व्या उपनिरीक्षकांच्या तुकडीचा ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’चा मानकरी ठरला. तसेच, यशवंतराव चव्हाण गोल्ड कप ऑल राऊंड कॅडेट ऑफ द बॅचचा चषकही काळे यानेच पटकावला.
दीक्षांत संचलनात उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आलेले कॅडेट…
▪️ अभिजीत भरत काळे: यशवंतराव चव्हाण गोल्ड कप – ऑल राऊंड कॅडेट ऑफ द बॅच
▪️ रेणुका देवीदास परदेशी : अहिल्याबाई होळकर कप – ऑल राऊंड वूमन कॅडेट ऑफ द बॅच
▪️ रुबिया ताजुद्दिन मुलाणी : बेस्ट कॅडेट इन ड्रिल
▪️ प्रशांत हिरामण बोरसे : “एन.एम. कामठे गोल्ड कप” बेस्ट कॅडेट इन राफल अँड रिव्हॉल्वर शूटिंग
▪️ अभिजीत भरत काळे : रिव्हॉल्वर ऑफ हॉनर – बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच
▪️ किरण सुभाष देवरे : डॉ. बी. आर. आंबेडकर कप – बेस्ट कॅडेट इन लॉ
▪️ किरण सुभाष देवरे : सिल्व्हर बॅटन – बेस्ट कॅडेट इन स्टडीज
▪️ किरण सुभाष देवरे : सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच
प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. १२२ (सरळ सेवा) चे प्रशिक्षण सत्र हे १ ऑगस्ट, २०२२ पासुन सुरु झाले. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध भागातून निवड झालेल्या ३४९ पुरुष व १४५ महिला प्रशिक्षणार्थीचा समावेश असून १ प्रशिक्षणार्थी गोवा राज्याचे आहेत. एकूण ४९४ पोलीस उपनिरीक्षकांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणार्थी पैकी ८८ टक्के प्रशिक्षणार्थी हे पदवीधर व १२ टक्के पदव्युत्तर आहेत, यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांनी दिली.
या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आाशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय उपस्थित होते.
More Stories
मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा क्र. १ व २ मधील सर्व कामांना गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
महाराष्ट्राला देशात स्वच्छतेत अव्वल स्थान मिळावा यासाठी “एक तारीख एक तास” उपक्रमात सहभागी व्हा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर होणार दही हंडी, गोविंदांना विमा कवच..