May 17, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

महाराष्ट्राला देशात स्वच्छतेत अव्वल स्थान मिळावा यासाठी “एक तारीख एक तास” उपक्रमात सहभागी व्हा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :

स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” आज रविवार १ ऑक्टोबर रोजीच्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात शहरे तसेच ग्रामीण भागात “एक तारीख एक तास” हा उपक्रम केंद्र शासनाने आयोजित केला असून नागरिकांनी स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभाग व्हायचे आहे. गाव तसेच शहरातल्या प्रत्येक वॉर्डात सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरुवात होईल. यात सफाई मित्रही सहभागी होतील.

मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की, “एक तारीख एक तास” या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहीम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे. आपआपल्या परिसरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहीम राबवायची असून स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल आणि जिल्हा प्रशासन आपल्या मदतीसाठी सज्ज असेल असेही मुख्यमंत्री म्हणतात.

या अभियानानंतर १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा देखील यशस्वी करायची आहे. महाराष्ट्र कचरा मुक्त करूया. स्वच्छ, सुंदर करूया. स्वच्छतेचा जागर करूया, असेही मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात.