बालेवाडी :
पुणे शहरातील महाळुंगे-बालेवाडी येथे असलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे नाव गुगल मॅपवर बदलण्यात आले असून अज्ञात समाजकंटकांनी या क्रीडा संकुलाचे नाव बदलून ‘छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ असे केल्यामुळे स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी तातडीने बाणेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
आपल्या निवेदनात माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी म्हटले आहे की, “आमच्या भागातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे नाव काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक बदलले आहे. यामुळे भागातील शिवप्रेमी, खेळाडू आणि नागरिक अत्यंत संतप्त झाले आहेत. अशा समाजकंटकांवर तातडीने कारवाई करावी.”
अमोल बालवडकर यांनी पुढे सांगितले की, गुगल मॅपवर जाऊन अशा प्रकारे लोकेशन एडिट करणे आणि नाव बदलणे हा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हा तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर असून, याचा गैरफायदा घेऊन इंटरनेटवरील हॅकर इतरही गुन्हे करू शकतात. त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, गुगल मॅपवरील हे बदललेले नाव त्वरित पूर्ववत करण्याची विनंती त्यांनी केली आहे.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले