November 22, 2024

Samrajya Ladha

उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य शासन आणि टाटा पॉवर कंपनी यांच्यातील सामंजस्य करार..

मुंबई :

अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य शासन आणि टाटा पॉवर कंपनी यांच्यातील सामंजस्य करार अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

भविष्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प अधिक महत्त्वाचे आणि उपयोगी ठरणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी महाराष्ट्र शासन व नॅशनल टाटा पॉवर लि. कंपनी यांच्यात आज उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री यांच्या दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, मराविमं सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, नॅशनल टाटा पॉवर लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रविर सिन्हा, विनय नामजोशी, प्रभाकर काळे, अभिजीत पाटील उपस्थित होते.

२८०० मेगावॅटच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार होणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. मागील काळात उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र शासनाने अतिशय आक्रमकपणे भूमिका घेऊन मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार केले आहेत. महाराष्ट्र हे उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त जागा असलेले राज्य आहे. अशा सर्व उपयुक्त जागांचा उपयोग करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. त्यासाठी राज्य शासनाने चांगले धोरण तयार केले आहे.

टाटा पॉवरने हा सामंजस्य करार कृतित आणून वेगाने काम सुरू करावे. यासाठी वैधानिक मान्यता व सर्व मदत करण्यास शासन तयार आहे. टाटा पावर महाराष्ट्रात काम करतेच आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पाचे काम सुद्धा टाटा पॉवर कंपनी त्यांच्या नावाला साजेसे करतील, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.