May 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना भाजप प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अप्रत्यक्षपणे ऑफर..

मुंबई :

काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता म्हणून विजय वडेट्टीवार यांची आज विधानसभेत नियुक्तीची घोषणा झाली. दरम्यान, वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना भाजप प्रवेशासाठी अप्रत्यक्षपणे ऑफर दिली.

 

शेवटी ज्याला कुठेच न्याय मिळत नाही, त्याला आम्हाला न्याय द्यावा लागतो, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये मंत्रीपदासाठी, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून आणि त्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटेंचे नाव चर्चेत होते. तीनही वेळा काँग्रेस आमदार थोपटे यांना हुलकावणी मिळाल्याने, वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाच्या ठरावादरम्यान बोलताना, संग्राम भाऊंबाबत नेहमी असे का होते, असे म्हणत फडणवीस यांनी सवाल उपास्थित केला.

फडणवीस यांनी या वेळी संग्राम थोपटे यांना काँग्रेसकडून डावलण्यात येत असल्याबाबत भाष्य केले. काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असल्याने काँग्रेसचा एक मोठा गट फुटणार अशी चर्चा असतानाच फडणवीसांच्या भाष्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संग्राम थोपटेंच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.

आम्ही ऐकत होतो की, विधानसभेचे अध्यक्ष संग्राम थोपटे होणार. संग्रामभाऊंची चिठ्ठी निघालीय, पण त्यांच्या नावाची चिठ्ठी डिस्पॅच होता होता कुठे अडते, हे कळत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.