September 17, 2024

Samrajya Ladha

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मांडली विधिमंडळात छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील निरुपयोगी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत लक्षवेधी..

मुंबई :

राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी चिकन, मटन, अंडी, मासे निरुपयोगी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत लक्षवेधी मांडली.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, “माझ्या छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये औंध, बोपोडी भागामध्ये अंडी, चिकन, मटन अशा सर्व प्रकारच्या विक्रेत्यांचे विविध मार्केट व हॉटेल्स आहेत. हा परिसर अतिशय गजबजलेला असून सुमारे शेकडो दुकाने व आजूबाजूच्या परिसरात ही दुकाने व हॉटेल्स सकाळपासूनच सुरू असतात. काही दुकानदार व हॉटेलचे कर्मचारी रात्री आपला व्यवसाय बंद करताना उर्वरित राहिलेले चिकन, मटन, अंडी, मासे निरुपयोगी कचरा ते मुळा नदीपात्रामध्ये टाकत असतात. यामुळे याठीकाणाहून जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होतो व त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच यामुळे नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा बऱ्याच समस्या याठिकाणी येत असून अशाच समस्या पूर्ण पुणे शहरामध्ये निर्माण होत आहेत.

पुणे मनपा मार्फत या जागेची दररोज स्वच्छता केली जाते परंतु या निरुपयोगी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता पुणे महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारची उपाययोजना कार्यरत नाही. दररोज पुणे शहरामध्ये हा कचरा जवळपास १० टन पर्यंत जमा होण्याचा अंदाज आहे. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली गेली नाही तर येणाऱ्या काळात पुणे शहरामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो.

पूर्वी पुणे मनपाकडे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती परंतु गेली २ वर्षांपासून ती बंद आहे. पुणे मनपाच्या भरपूर जागा पडून आहेत. ज्याठिकाणी लोकवस्ती नाही अशा ठिकाणी चिकन, मटन, अंडी, मासे निरुपयोगी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठा प्लांट उभारण्याची अत्यंत गरज आहे.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मंत्री महोदयांना २ स्पेसिफिक प्रश्न विचारले….

१) पुणे शहरामध्ये पुणे मनपा तर्फे चिकन, मटन, अंडी, मासे निरुपयोगी कचऱ्याची विल्हेवाट तातडीने लावण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पुणे मनपाला देणार का?

२) यासाठी लागणाऱ्या प्लांटसाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करणार का?

३) यासाठी किती कालावधी लागेल?

यावर उत्तर देताना मंत्री महोदय उदय सामंत यांनी सांगितले की लवकरच पुणे मनपाला चिकन, मटन, अंडी, मासे निरुपयोगी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्लांट उभारण्याबाबत सूचना दिल्या जातील असे आश्वासन यावेळी दिले.