September 19, 2024

Samrajya Ladha

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी ! वारीची भव्यता, सार्वजनिक आरोग्य विभागाची सज्जता..

पुणे :

आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या भेटीसाठी राज्यात पालखी सोहळा सुरू झाला असून १३ जूनला श्री संत गजानन महाराज मंदिर ‘श्रीं’च्या पालखीने शेगाव, बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण पालखी मार्गावर आतापर्यंत (१४ जून) एकूण १ हजार ७४३ वारकऱ्यांना आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, देहू-आळंदी ते पंढरपुर तसेच महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या हजारो पालख्या, दिंड्या मार्गावर आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहे.

*महाराष्ट्रातील मानाच्या विविध पालख्यांच्या मार्गावर देण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सेवा-सुविधा –

* आरोग्य विभागाकडून एकूण ६ हजार ३६८ अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत महाराष्ट्रातील विविध पालखी मार्गावर आवश्यकतेनुसार वारकऱ्यांची मोफत तपासणी व औषधोपचार करुन आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.

* २५८ तात्पुरत्या ‘आपला दवाखान्या’च्या माध्यमातून (प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर १ याप्रमाणे) मोफत सेवा पुरविण्यात येत आहे.

* ७०७ (१०२ व १०८) रुग्णवाहिकांमार्फत पालखी मार्गावर २४x७ पद्धतीने आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.

* पुणे परिमंडळ पुणे व पुणे जिल्हा परिषद स्तरावरुन ४ आरोग्य पथके सुसज्ज रुग्णवाहिकेसह अविरत पालखी परतेपर्यंत सोबत राहणार आहेत.

* २१२ आरोग्यदुतांमार्फत (बाईक ॲम्बुलन्स) पालखी मार्गावर आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.

* ५ हजार ८८५ औषधी किटचे विविध दिंडी प्रमुखांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.

* १३६ हिरकणी कक्षांची स्थापना पालखी मार्गावरील आरोग्य संस्थेच्या ठिकाणी तसेच पालखी तळावर करण्यात आलेली आहे.

• महिला वारकऱ्यांसाठी १३६ स्त्रीरोग तज्ज्ञ पालखी मार्गावरील रुग्णालयामध्ये कार्यरत असतील.

• पालखी मुक्कामच्या प्रत्येक ठिकाणी ५ बेडची क्षमता असलेले ८७ अतिदक्षता विभाग उभारण्यात आलेले आहेत.

• पालखी मार्गावरील सर्व हॉटेल्स व त्याअंतर्गत असलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी तसेच पाणी नमुने तपासणी करण्यात येत असून, पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणच्या किचनची देखील तपासणी करण्यात येणार आहे.

• पालखी मार्गावर १५६ टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येणार असून पालखी मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी धूर फवारणी, पाण्याच्या सर्व स्रोतांचे ओटी टेस्ट तसेच आरोग्य संस्थांमार्फत जैव कचरा विल्हेवाट करण्यात येत आहे.

* पालखी मार्गावर आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येणार आहे.