औंध :
नर्मदाष्टक उपासना मंडळ हे नर्मदाप्रणीत नदीप्रेमी व्यक्तींचे संघटन आहे. लोकांना नदी किनारी घेऊन जा, ते आपोआपच विचारप्रवृत्त होत नद्यांना केवळ पाणीवाहक (Water Body) समजणे बंद करून तिला कचरामुक्त करत स्वच्छ व पवित्र बनवतील, या अनुभुत विचाराला मध्यवर्ती भुमिका मानत नर्मदाष्टक उपासना मंडळ नदीकिनारी वर्षभर काहीनाकाही कार्यक्रमाचे आयोजन करत असते. महाराष्ट्रासह देशाच्या इतर राज्यांमध्येही हे कार्यक्रम होत असतात. आचरणीय नर्मदाभक्तीचे धडे इथे शिकत ते समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत ते नर्मदादूत बनण्याचा प्रयत्न करत असतात.
सध्या रामजन्मभूमीवर प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने या आनंदोत्सवात आपण आपल्या गावनदीला तिच्या लेकरांसह म्हणजे तिच्यातील जलचर, नभचर (पक्षी) व जलदेवतांसह आमंत्रित करावे म्हणून आपापल्या गावनद्यांकिनारी कार्यक्रम घ्यावे हे ठरले. यात आता पर्यंत तीन कार्यक्रम झालेत. पुणे, नाशिक व नागपूर.
शनिवार दिनांक १३ जानेवारीला झालेला पुण्याचा कार्यक्रम खूप छान झाला. सौ. यशश्रीताई तावसे व सौ. मीनाताई कारिया यांनी पुढाकार घेऊन औंध ला मुळानदी किनारी छान कार्यक्रम घडवून आणला. पहिल्याच कार्यक्रमाला तीसच्यावर संख्या होती, व श्री. गणेश कलापुरे यांनी तिथे केलेले प्रबोधनही अगदी नर्मदाष्टक उपासना मंडळाला अनुकूलच होते. नदीस्वच्छता व तिची निर्मळता या विषयी बोलताना ते म्हणाले आपल्या दैनंदिन जीवनातील रोजच्या वापराच्या वस्तू पर्यावरणस्नेही असाव्यात नदी विषयीची आपली श्रद्धा तेव्हांच फलद्रूप होईल जेंव्हा आपली मुलं आपली पुढची पिढी या घाटावर या नदीत पोहतिल या घाटावर या नदीचं पाणी पितिल तेंव्हाच नर्मदामैया, गंगामैया ,मुळाई नदी आपल्यावर प्रसन्न झाली असे आपल्याला म्हणता येईल त्यासाठी सर्व समाजाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
गंगा व नर्मदा मैय्याची आरती झाल्यानंतर सौ. तावसे ताईंनी रचलेली मुळाई नदीची आरती म्हणत मुळाईलाही ओवाळले.
अंधार पडता पडता झालेले दीपदान प्रत्येकाच्या चेहऱ्यासकट ह्रदयालाही तेजस्वी करून गेलेले स्पष्ट दिसत होते.
या कार्यक्रमाला औंधवासी नागरिकांसह श्री.रविंद्र जेजुरीकर, सौ.सीमा महामुनी, संध्या बोरसे, जयेंद्र पौनीकर हे नर्मदाभक्त बऱ्याच लांबून येऊन हजर राहिले होते.
पुण्याची एक अनुकुलता म्हणजे श्री. व सौ. तावसेंचा उत्फुर्त सहभाग. मला आठवते की नर्मदाष्टक उपासना मंडळ कदाचित नागपूर पुरतेच मर्यादित राहिले असते. पण यशश्री ताईंनी इतकी सहज सुंदर साथ दिली की सोशल मिडिया वापरणाऱ्या महाराष्ट्राच्या विविध भागातील किमान २०% नर्मदा मैय्या भक्तांना नर्मदाष्टक उपासना मंडळ व शनिवारची उपासना माहित आहे.
तावसे परिवारा सारखे उत्फुर्त सहभाग घेणारे मैय्याभक्त हे आदर्श नर्मदादूत आहेत. त्यांच्यामुळेच नर्मदाभक्ती ही अध्यात्मिक सामाजिक व पर्यावरणीय पद्धतीने कशी करावी हे शिकणे सहज सुलभ होत आहे.
रविवार दिनांक १४ जानेवारीला नाशिकलाही आपल्या आशाताई सोनवणे व स्नेहलताई दोपावकर यांच्या सक्रिय सहभागाने गोदावरी काठावर चांगल्या संख्येनी व लोक सहभागानी कार्यक्रम पार पडला.
नर्मदा नदीत एक शक्ती आहे, ती संकटांच्या पहाडांना चीरत, पाहाड फोडत समोर वाहत जाते. अगदी अशीच आपली भगिनी आशाताई आहे. नौकरीतील किचकटता व घरचे काम यातूनही त्या सामाजिक सहभागासाठी वेळ काढतातच. अंतरंगीय उत्साहामुळे त्या कधीही थकलेल्या दिसत नाहीत. नर्मदामैय्याने अखंड चैतन्याचे वरदान आशाताईंना दिलेले आहे.
नागपूरातही नागनदी संगमावर कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला अंदाजे ४० जण उपस्थित होते. सौ स्मिता ताई केळकर या जेष्ठ भगिनीसह पौर्णिमा ताई नाफडे, अनंतदादा वकील, गोपालदादा इटनकर व पुरुषोत्तमदादा वानखेडे हे नर्मदाष्टक उपासना मंडळाच्या नित्य कार्यक्रमांना तन मन धनाने हजर असणारे सदस्यही होतेच.
एका दिवशी एकाच गावचा कार्यक्रम होऊ द्यावा हा विचार करून नागपूरचा कार्यक्रम आपण मकरसंक्रांतीच्या दिवशी घेतोय, त्यामुळे किती संख्या राहील, ही साशंकता होती. साडेपाचला कार्यक्रम सुरू झाला त्या दरम्यान सूर्य बराच प्रखर होता. दीपदान करायचे तर अंधार पडे पर्यंत कार्यक्रम सुरू ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे नर्मदाष्टक आवर्तध पश्चात उपस्थित साऱ्यांना गुंतवून ठेवायला, नर्मदाष्टक उपासना मंडळाची स्थापना कशी झाली, पुढे मैय्याचे मार्गदर्शन लाभत मागच्यावर्षीची नर्मदा जयंती कशी अनेक गावांमध्ये गावनदी किनारी झाली , या विषयासकट या उपासनात्मक चळवळीतून कसे अध्यात्मिक, सामाजिक व पर्यावरणीय कार्य उभे राहात आहे याचे विवरण दिले.
नर्मदादूत म्हणजे काय? हा विषय कसा आचरणीय आहे, हे सांगतांनाच नदीचे वळणा वळणात्मक प्रवाही जीवन सांगितले. कुठलीही नदी सरळ वाहत नाही. कारण नदी जर सरळ वाहीली तर तिची स्वयंशुद्धीची शक्ती नष्ट होते. दर वळणावर नदी आपल्या प्रवाहवेगाने तिच्यातील कचरा जडत्ववेगाने (Inertia) काठावर सोडत, निर्मळ बनत ती समोर वाहत राहते. त्याप्रमाणेच आपण नर्मदादूत म्हणून रोजच्या जीवनात तयार झालेला मनातील मान – अपमानाचा व अनावश्यक आसक्तीचा कचरा प्रत्येक वळणावर सोडून निर्मळ होऊ शकलो पाहीजे.
पर्यावरणीय जीवनाचा विचार करता, आपण शाकाहाराचे आत्यंतिक स्तोम माजवतो. पण आपल्या प्रदुषणात्मक जीवनशैलीने आपण कितीतरी जीवांना जगणे यातनामय करत असतो. घरातील साबण व फ्लोर क्लिनर चे सांडपाणी घाणीसह नदीत जाते. त्यामुळे त्यातील रसायनांनी जलचर व नभचर (पक्षी) मरतात. पाॅलिथिन मध्ये उष्टे व शिळेअन्न घराबाहेर टाकल्याने गायी मरतात. जन्मपत्रिकेतील दोष बघत कोणी ज्योतिषी सांगतो की भैरवाला प्रसन्न करायला कुत्र्याला खाऊ घाला. घरची पोळी टाकण्या ऐवजी तो पारले चे गोड बिस्किटे टाकतो व साखर पोटात गेल्याने कुत्र्यांना खरूज होते.
नर्मदा ही साऱ्या जीव जंतूंना भुक्तीमुक्ती दायक असल्याने आम्हा नर्मदाभक्तांकडून कोण्या प्राण्याचेच नव्हे तर पर्यावरणाचेही अहित होऊ नये.
सायंकाळ होता होता सर्वांनी नदीला सुगंधी द्रव्य अर्पण केले. त्यानंतर आनंदाक्षता वाहत तिला रामजन्मभूमीवरील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला तिच्यातील जलचर, नभचर (पक्षी) व जलदेवतांसह उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले गेले. श्रीराम, गंगा नर्मदेची मुळा नदीची आरती करण्यात आली व नंतर उत्साहात पानांच्या द्रोणात दीपदानाचा सोहळा पार पडला. टिम टिम करत लांबच लांब वाहत जाणारे दिवे परिसरातील लोकांनाही आनंदित करून गेलेत. तिळगुळाचा प्रसाद वाटून कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमाला भरपूर नवीन सदस्य उपस्थित होते. आपली गावनदी ही चेतनामय उर्जा प्रवाह आहे हे ऐकून सर्वांना फार छान वाटले.
पुणे, नाशिक व नागपूर च्या कार्यक्रमा नंतर इतर ठिकाणच्या नर्मदामैय्याभक्तांनीही एकत्रित येऊन आपल्या गावनदीला रामजन्मभूमीवरील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देऊन तिची आनंदमयी आत्मचेतना जागृत करण्याचे काम करायला हवे.
More Stories
पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या वतीने अण्णा माझीरे यांचा आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मान!!!
बालेवाडी येथील मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अमोल बालवडकर फाऊंडेशनचा मदतीचा हात!
बाणेरमध्ये भाजपा कोथरूड उत्तर मंडलाच्या वतीने भारतीय सैन्याच्या विजयाचा जल्लोष!