November 21, 2024

Samrajya Ladha

इंद्रायणी नदी स्वच्छता अन्‌ संवर्धनाच्या जागृतीसाठी भोसरी येथे ‘रिव्हर सायक्लोथॉन’ : सचिन लांडगे

पिंपरी :

इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती अभियान अंतर्गत ‘रिव्हर सायक्लोथॉन – २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे आपले ६ वे वर्ष आहे. ‘‘आपली इंद्रायणी नदी सर्वांनी प्रदूषित मुक्त करून स्वच्छ ठेवावी’’. या संकल्पनेवर भर दिला आहे. गतवर्षी या उपक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे.

आमदार महेश दादा लांडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित केला असून, प्रतिवर्षी मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता यावर्षी आपण ‘सायकलची सर्वात मोठी रांग’ हे (‘Longest line of bicycles (static)’) हे रेकॉर्ड, गिनीस वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे रेकॉर्ड शनिवारी, दि.२ डिसेंबर रोजी भोसरी गावजत्रा मैदान येथे सकाळी ६ वाजता करण्यात येईल आणि रिव्हर सायक्लोथॉन रॅली ही रविवार, दि.३ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता भोसरी गावजत्रा मैदान येथे होणार आहे अशी माहिती कामगार नेते सचिन लांडगे यांनी दिली.

बुधवारी पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी रिव्हर सायक्लोथॉनचे मुख्य समन्वयक डॉ. निलेश लोंढे आणि सचिन लांडगे, अविरत श्रमदानचे दिगंबर जोशी, डॉ. आनंद पिसे, सचिन मरगज, सायकल मित्र पुणेचे बापू शिंदे, संतोष गाढवे, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे बापू बांगर, वाहतूक विभागाचे साळुंखे, गिनीस वर्ल्ड रेकॉर्डस् चे भारतातील फॅसिलिटेटर मिलिंद वेर्लेकर तसेच इतर सामाजिक संस्थातर्फे डब्ल्युटीई इन्फ्रा चे विवेक जोशी, आयआयबीचे ॲड. लोहारे, रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरीचे प्रेसिडेंट विवेक येवले, लायन्स क्लब ऑफ भोजापुर गोल्डचे सदस्य उपस्थित होते.

डॉ. नितीन लोंढे यांनी सांगितले की, रविवारी रिव्हर सायक्लोथॉन तीन विभागात होणार आहे. पाच किलोमीटर, १५ किलोमीटर आणि २५ किलोमीटर असे हे विभाग आहेत. या रॅलीसाठी २५ हजारपेक्षा जास्त सायकलिस्ट येतील असा अंदाज आहे असे नियोजन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस करणार सारथ्य…
रिव्हर सायक्लोथॉनचे यावर्षीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रॅलीचे सारथ्य पिंपरी चिंचवडच्या पोलीस विभागाकडून करण्यात येणार आहे. पोलीस विभागाकडून लोकांनी रहदारीचे नियम काटेकोर पाळण्याचे आवाहनसुद्धा या रॅलीद्वारे करणार आहेत. प्रत्येक आठवड्याचा सोमवार हा ‘हॉर्न फ्री’ दिवस पाळून हॉर्न न वाजवता ध्वनी प्रदूषण नियंत्रणचा संदेश देता येईल. तसेच प्रत्येक आठवड्याचा बुधवार हा सायकल दिवस म्हणून पाळला जावा यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आयुक्तालय आणि पोलिस अधिकारी, कर्मचारी पुढाकार घेणार आहेत.

आयोजनात अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड नगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलीस विभाग आणि इतर पर्यावरण प्रेमी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या दोन्ही कार्यक्रमांची माहिती व इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान याबद्दलची माहिती पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व शाळा आणि हाउसिंग सोसायटी यांना भेट देऊन दिलेली आहे, असेही दिगंबर जोशी यांनी सांगितले.

या उपक्रमामध्ये पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शेखर सिंह (आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ), विनय कुमार चौबे ( पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड) व आमदार महेशदादा लांडगे यांनी केले आहे.