September 17, 2024

Samrajya Ladha

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात पिण्याच्या पाईपलाईन दुरुस्त न केल्यास चक्का जाम आंदोलनाचा मनसे चा इशारा..

पुणे :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात पिण्याच्या पाईपलाईन गेली २ ते ३ महिने झाले खराब झाल्याने त्यामधून रोज लाखो लिटर पाणी वाया जात असुन पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, म्हणून मनसे वतीने महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. जर त्वरीत दखल घेण्यात आली नाही व दुरुस्ती केली नाहि तर मनसे स्टाईल ने चक्का जाम आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी मनसे वतीने देण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात पिण्याच्या पाईपलाईन गेली २ ते ३ महिने झाले खराब झाल्याने त्यामधून रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे सदरचे पिण्याचे पाणी थेट रस्त्याने वाहत जात असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. पाणी उताराच्या दिशेने भारतीय रिझर्व्ह बँक, स्वातंत्र्यवीर चाफेकर बंधू यांचा पुतळा खैरेवाडी पर्यंत ३ किलोमीटर मुख्य रस्त्याने वाहत जात आहे त्यामुळे रस्त्यावर शेवाळ होऊन रस्ता निसरडा झाला आहे ते रस्त्यावर खोलगट भागात जमा होते त्यामुळे या रस्त्यावर वारंवार दुचाकी घसरून अपघात होत आहेत.

त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी आपल्या औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय व घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना या बाबत तक्रार केली होती. परंतु ते आमच्या हद्दीत नसल्याचे दोन्ही कडील अधिकारी सांगतात व याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे येथील नागरिक आमच्या कार्यालयात येऊन तक्रार करत आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकापासून २ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सोमेश्वरवाडी भागात नागरिक पाण्यावाचून वंचित आहे.  सध्या पावसाळ्याचे दिवस संपून उन्हाळ्याचे दिवस सुरु होतील त्यामुळे थोड्या दिवसांनी पाणी टंचाई होऊ शकते जर हेच पाणी जर वाचवले असते तर त्याचा उपभोग नागरिकांना घेता आला असता.

म्हणून मनसे वतीने निवेदन देत येत्या २ दिवसात सदरची पाईपलाईन दुरुस्त करून पाण्याचा होणार अपव्यय थांबवावा. व नागरिकाचे कररुपी पैशांची होणारी हेळसांड थांबवावी हि विनंती करण्यात आली आहे. जर येत्या २ दिवसात पाइपलाइनची दुरुस्ती झाली नाही तर सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात मनसे स्टाईल चक्काजाम आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.

यावेळी पुणे शहराचे उपाध्यक्ष सुहास निम्हण, छ शिवाजीनगर उपविभागाध्यक्ष संजय तोडमल, शाखाध्यक्ष आयुष्य बोबडे व मनसैनिक उपस्थित होते.