November 22, 2024

Samrajya Ladha

डीजे आणि लेझर बंदी विषयी कॅटलिस्ट फाउंडेशन जनहित याचिका दाखल करणार

पुणे :

उत्सवी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी कॅटलिस्ट फाउंडेशनने ठोस भूमिका घेतली आहे. डीजे आणि लेझरमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कॅटलिस्ट फाउंडेशनमार्फत न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. या जनहित याचिकेत शिवसेना सहसंपर्कप्रमुख अजय भोसलेही सहभागी होणार आहेत. अशी माहिती वरिष्ठ पत्रकार तसेच कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी दिली.

याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले, हल्ली अनेक सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात तसेच वैयक्तिक कार्यक्रमात डीजे व लेझर लावण्याची पद्धत नव्याने सुरु झाली आहे. मात्र असे कार्यक्रम साजरे करताना डीजेचा कर्णकर्कश्य आवाज, लेझरचा वापर वाढला आहे. यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. डीजेच्या अमर्यादित आवाजामुळे काहींना कायमचे बहिरेपण आले आहे तर काही जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. म्हणूनच डीजे आणि लेझरवर कायमस्वरूपी बंदी आणावी यासाठी कॅटलिस्ट फाउंडेशनमार्फत न्यायालयात आम्ही जनहित याचिका दाखल करत आहोत. यासंदर्भात काही वरिष्ठ वकिलांशी ही चर्चा करण्यात आली आहे.

सण- उत्सव तसेच विविध समाजिक राजकीय कार्यक्रमात होणाऱ्या हुल्लडबाजी तसेच बेकायदेशीर प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. अनेक पोलिसांनाही याचा त्रास सहन करावा लागला आहे. यावर्षी गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीनंतर धुळ्यातील १५ पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातही या पेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. यावर्षी डॉल्बीच्या आवाजाने दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यंदाच्या गणेश उत्सवात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट मुळे नाशिकच्या सहा जणांवर कायमची दृष्टी गमावण्याची वेळ आली आहे. धुळे, मुंबई आणि ठाण्यात सुद्धा असे रुग्ण आढळले असल्याचा माध्यमांनी रिपोर्ट दिले आहे. नुकताच पार पडलेल्या गणेश उत्सवात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यभरात पोलिसांकडून अनेक मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांची माहिती आम्ही घेत आहोत. डीजे मुळे होणारे नुकसान पाहता डीजे बंदीची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पासून व्हावी याविषयी आंबेडकरी चळवळीतील काही राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सोबत चर्चा केली. आमच्या या भूमिकेला या मान्यवरांसह अनेक सामाजिक मंडळांचा, सामाजिक संस्थांचा पाठींबा मिळत आहे. राज्यभरातून आंबेडकरी जनतेसह विविध समाजातील अनेकांनी आमच्या या भूमिकेला पाठींबा दिला.

डीजेचा आवाज अमर्यादित ठेवल्या संदर्भात आम्ही प्रदूषण मंडळाकडूनही माहिती घेत आहोत. यासंदर्भात आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे विभागीय अधिकारी श्री. शंकर वाघमारे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे गेल्या वर्षभरात केलेल्या कार्यवाहीचे स्वरूप, दाखल केलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी ते देणार आहेत. त्यानुसार आम्ही राज्यभरात डीजे आणि लेझरला बंदी घालावी म्हणून मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करत आहोत.