September 17, 2024

Samrajya Ladha

औंध, बाणेर, बालेवाडी, बोपोडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, म्हाळुंगे, सुस, बोपोडी परिसरात जोरदार मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद..

बाईक रॅली, पदयात्रा काढत घोषणा देत मराठा समाज एकवटला..

बाणेर :

आज सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा वतीने औंध बाणेर, बालेवाडी, बोपोडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, म्हाळुंगे, सुस, बोपोडी परिसरात जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांचा बळाचा वापर करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला याचा तीव्र निषेध करीत बंद पुकारला आणि बाईक रॅली आणि पदयात्रा काढत शांतता व शिस्तबद्ध पद्धतीने जोरदार निषेध मोर्चा काढला. तसेच निषेध नोंदविण्याकरता बालेवाडी फाटा येथे  कार्यकर्ते एक दिवसीय उपोषणाला बसले. बंद पुकारलेल्या सर्व गावांमधे सर्व दुकाने उस्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी व सर्व व्यापारी संघटनांनी उस्फूर्तपणे या बंदमध्ये सहभाग नोंदविला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत पाषाण, औंध, बालेवाडी, बाणेर, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील प्रत्येक गावागावांमधून मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भव्य असे मोर्चे काढत मराठा समाजाच्या भावना तीव्र स्वरूपात मांडल्या.

आज सायंकाळी पाच वाजता आंदोलनाची सांगता सर्व नागरीकांच्या उपस्थित होणार आहे. या मोर्चाला सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेत निषेध नोंदविला. या वेळी एक मराठा लाख मराठा! आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा देण्यात आल्या.

मराठा समाजातील बांधवांच्या मागण्या पुढील प्रमाणे :

१)मराठा समाजाला सरसकट मराठा कुणबी ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यासाठी जीआर काढण्यात यावा.

२) एखाद्या गावामध्ये मराठा समाजाच्या भावकीमध्ये ओबीसी प्रमाणपत्र असल्यास त्या आधारे त्या गावातील आडनावांच्या सर्वांना अर्ज प्रक्रियेद्वारे ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे.

३) जालना येथील आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज ची चौकशी करून संबंधितांचे कायमस्वरूपी निलंबन करण्यात यावे.

४) मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या निधीमध्ये व उपक्रमांमध्ये वाढ करण्यात यावी

५) जातीय जनगणना करण्यात यावी

६) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज वाटप प्रक्रिया सहकारी बँका व पतसंस्था यांच्या माध्यमातून देखील करण्यात याव्या.

७) बाणेर, बालेवाडी परिसरामध्ये येणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल बांधण्यात यावे.