September 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील अंबर सोसायटीच्या समस्यांवर समीर चांदेरे यांची धाव; नागरिकांना तात्काळ निराकरणाचे आश्वासन

बाणेर , ७ जुलै २०२५:

बाणेर येथील अंबर सोसायटीमधील रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या सोबत एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत सोसायटीच्या अनेक सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांना दररोज सामना कराव्या लागत असलेल्या सार्वजनिक समस्यांवर सखोल चर्चा झाली.

 

या बैठकीत पाणीटंचाई, खराब झालेले रस्ते, अपुऱ्या स्वच्छतेची व्यवस्था, पथदिव्यांची समस्या, आणि वाढती सुरक्षा चिंता यांसारख्या अनेक मूलभूत प्रश्नांवर रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक प्रशासनाकडून या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा सूर यावेळी उमटला.

समीर चांदेरे यांनी रहिवाशांच्या प्रत्येक समस्येचे गांभीर्याने आकलन करून घेतले. त्यानंतर त्यांनी उपस्थित नागरिकांना आश्वस्त केले की, या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. विशेषतः, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मा. श्री. बाबुराव चांदेरे साहेब यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली या सर्व समस्यांवर युद्धपातळीवर काम केले जाईल आणि येत्या काळात त्या तातडीने दूर केल्या जातील, असे आश्वासन समीर चांदेरे यांनी दिले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे म्हणाले, “स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवणे हे आमचे प्राधान्य आहे. अंबर सोसायटीतील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आम्हाला पूर्ण माहिती मिळाली आहे आणि आम्ही त्या गांभीर्याने घेतल्या आहेत. बाबुराव चांदेरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करून या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करू.”

या बैठकीमुळे अंबर सोसायटीतील रहिवाशांमध्ये आशेचे किरण निर्माण झाले असून, समीर चांदेरे यांच्या पुढाकाराचे नागरिकांनी स्वागत केले आहे. आगामी काळात या समस्यांवर काय उपाययोजना केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.