पुणे :
महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने स्व. आमदार विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुरेश नवले, अर्जुन खोतकर, आमदार प्रसाद लाड, सिद्धार्थ शिरोळे, सनी निम्हण, आरोग्य संचालक डॉ.अजय चंदनवाले आणि राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री.पवार म्हणाले, कोविड काळाने आरोग्यसेवा सर्वात जास्त महत्वाची असल्याचे दाखवून दिले. राज्य शासनानेदेखील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आरोग्यसेवेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये २१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २ हजार ४१८ संस्थांमध्ये नि:शुल्क उपचार होणार आहेत. राज्यात ॲडेनो व्हायरसमुळे डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून पुण्यात साथीचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
पावसाळ्याचे दिवस असल्याने आरोग्य विभागामार्फत साथजन्य आजारांपासून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. साथीच्या आजारावर नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्राथमिक टप्प्यातच अशा आजाराचे निदान झाल्यास रुग्णांचा त्रास कमी होतो. मात्र उपचारासोबत आजार होऊ नये यासाठी दररोज व्यायाम करणे, व्यसनापासून दूर राहणे, सकस आहार घेणे, वेळेवर आरोग्य तपासण्या करणे, तणावमुक्त जीवन जगणे गरजेचे आहे. प्रकृतीची काळजी घेताना जीवनशैलीत बदल आणायला हवा. आरोग्य शिबिरात मोफत वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्व. विनायक निम्हण यांनी सामाजिक कार्य करताना चांगल्या प्रकारची मैत्री जोपासली असेही.पवार म्हणाले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री.भुजबळ म्हणाले, महाआरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर्स सहकार्य करण्यासाठी येतात हे कौतुकास्पद आहे. या माध्यमातून अनेक गोरगरिबांना आरोग्यसेवा मिळणार आहे. ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ ही संतांची शिकवण आहे. अशा पद्धतीने विविध व्याधीने त्रस्त असलेल्या नागरिकांवर शिबिराच्या माध्यमातून विनामूल्य उपचार करण्यात येणार आहे. म्हणून या शिबिराला विशेष महत्व आहे, असे त्यांनी सांगितले. स्व. आमदार विनायक निम्हण यांनी सर्वसामान्य जनतेसाठी कार्य केले, असेही भुजबळ म्हणाले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोविडच्या निमित्ताने आरोग्यसेवेचे महत्व लक्षात आले. आरोग्याच्या अनेक समस्या समोर येत असताना उपचाराला बऱ्याचदा मर्यादा येतात. अशावेळी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून चांगली सेवा घडते आणि नागरिकांना फायदाही होतो, असे त्यांनी सांगितले. स्व. आमदार विनायक निम्हण यांनी जात, धर्म पलीकडे नाती जपली असेही.पाटील म्हणाले.
विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले, माणसात आणि सेवेत देव आहे असे समजून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे कार्य करत असल्याने त्यांची सेवा महत्वाची आहे. शिबिराचे सूक्ष्म नियोजन करण्यात आल्याने त्याचा अनेकांना लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.
आमदार सिद्धार्थ शिरोळे, निरामय फाऊंडेशनचे रामेश्वर नाईक, सनी निम्हण यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रारंभी उपमुख्यमंत्री. पवार आणि पालकमंत्री. पाटील यांनी शिबिरांची पाहणी केली. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिबिरासाठी आलेल्या राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. मंत्री.महाजन यांनीदेखील शिबिराला भेट देऊन नियोजनाची माहिती घेतली व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाध साधला.
महाआरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले होते. तपासणीनंतर मोफत औषध देण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. तपासणी नंतर आवश्यकता असल्यास गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात येणार आहे.
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…