बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थिनींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. वृशाली सोमाणी यांनी विद्यार्थिनींना किशोरावस्था, मासिक पाळी व आरोग्य यासंबंधी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास संस्थेच्या माननीय संचालिका सौ. रेखा बांदल मॅडम तसेच माननीय सौ. निर्मल पंडित मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
डॉ. वृशाली सोमाणी या BAMS, MD (Ayurveda – Panchakarma) पदवीधर असून त्यांनी कालिदास विद्यापीठातून संस्कृत विषयात एम.ए., तसेच योग विषयात डिप्लोमा (पुणे) आणि गर्भसंस्कार व ANC मध्ये डिप्लोमा प्राप्त केला आहे. त्या बावधन येथील “श्री आयुर्वेद क्लिनिक” या दवाखान्याच्या संस्थापक असून गेल्या १५ वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत.
आपल्या व्याख्यानात त्यांनी विद्यार्थिनींना किशोरावस्था म्हणजे काय आणि त्या काळात शरीरात कोणते शारीरिक व हार्मोनल बदल होतात याबद्दल सोप्या व समजण्यासारख्या भाषेत माहिती दिली. या काळात होणारे बदल कोणते सामान्य असतात आणि कोणते बदल आरोग्याच्या दृष्टीने लक्ष देण्यासारखे असतात, हेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शरीरात निर्माण होणाऱ्या विविध हार्मोन्समुळे शरीरावर व मनावर कसा परिणाम होतो याचेही सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच त्यांनी मासिक पाळीची प्रक्रिया कशी व का होते, याबाबत सविस्तर माहिती देत ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबत भीती किंवा संकोच बाळगण्याचे कारण नाही, असे विद्यार्थिनींना समजावून सांगितले. मासिक पाळीदरम्यान स्वच्छता व आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
याशिवाय त्यांनी PCOD (Polycystic Ovarian Disease) या समस्येबाबत विद्यार्थिनींना माहिती देत ती कशी टाळता येऊ शकते तसेच जर PCOD निदान झाले तर योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीद्वारे स्वतःची काळजी कशी घ्यावी, याविषयीही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
या मार्गदर्शनपर व्याख्यानामुळे विद्यार्थिनींना मासिक पाळी, किशोरावस्था आणि वैयक्तिक स्वच्छता याबाबत अधिक स्पष्ट व सकारात्मक दृष्टीकोन मिळाला. तसेच या विषयांबाबत संकोच न बाळगता स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे आणि गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव विद्यार्थिनींना झाली.
हा कार्यक्रम विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरला.
या महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा विशेष कार्यक्रम संस्थेच्या माननीय संचालिका सौ. रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पर्यवेक्षिका सायली गायकवाड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी