बाणेर :
सकाळचे सहा वाजले की पुणे शहर पूर्णपणे जागे होण्याआधीच ती जागी झालेली असते. वाकडमधील घरात कुकरची शिट्टी वाजते तर कोथरूडमध्ये मुलांचे युनिफॉर्म इस्त्री केले जातात. बाणेरमध्ये ऑफिसमधील सादरीकरणाची मानसिक तयारी सुरू असते तर सदाशिव पेठेत वडीलधाऱ्यांच्या औषधांची आठवण ठेवली जाते. ती शांतपणे, नेमकेपणाने, जवळजवळ अदृश्यपणे हे सगळं सांभाळत असते.
ही ती आहे जी तुमच्या-आमच्यात, आजूबाजूला, तुमच्या अपरोक्षपणे, तुम्हा आम्हा सर्वांची काळजी घेत असते. ती कोणाची आई तर कोणाची बहीण तर कोणाची पत्नी आहे. ही आहे आजची आधुनिक स्त्री, व्यावसायिक आणि गृहिणी, हळवेपणाने काळजी करणारी आणि त्याच बरोबर धैर्याने निर्णय घेणारी, स्वप्न पाहणारी आणि ती पूर्ण करण्यासाठी झटणारी. आज जग जरी तिच्या यशाचा गौरव करत असले, तरी तिच्या खांद्यावरचं ओझं बऱ्याचअंशी अजूनही तसेच आहे व अनेकदा ते नजरेआड होतं.
आजची स्त्री सुशिक्षित आहे, महत्त्वाकांक्षी आहे आणि सक्षम आहे. ती कॉर्पोरेट क्षेत्रात नेतृत्व करते, न्यायालयात युक्तिवाद करते, रुग्णालयात उपचार करते, महाविद्यालयात अध्यापन करते आणि व्यवसाय उभा करते. पण घरी परतल्यानंतर जसे एखाद्या रंगमंचावरची घंटा वाजावी आणि पात्राची देहबोली बदलून जावी तशी ती घराच्या रंगमंचावर नवीन अवतारात सज्ज होते. स्वयंपाक, घराची जबाबदारी, मुलांचे शिक्षण, नातेसंबंधातील समतोल हे सगळं तिच्याच वाट्याला येतं आणि ती या सर्वांचा समतोल साधत आपला तोल ढळू न देता या सर्वांना न्याय देण्याची कसरत करत असते.
समाज ज्याला “मल्टीटास्किंग” म्हणतो, ते प्रत्यक्षात शारीरिक श्रम कमी आणि भावनिक श्रम जास्त असते. सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवणे, घरातील वाद शांत करणे, स्वतःच्या वेळापत्रकात बदल करून इतरांची सोय पाहणे, न बोललेल्या अपेक्षा ओळखणे हे तिचं न दिसणारं काम असतं. करिअरला प्राधान्य दिलं तर विचारलं जातं, “मुलांकडे लक्ष आहे ना?” घराला प्राधान्य दिलं तर विचारलं जातं, “इतकं शिक्षण कशासाठी?” जास्त कमावलं तर अस्वस्थता निर्माण होते, कमी कमावलं तर अवलंबित्व गृहीत धरलं जातं. या सर्व भावनिक घालमेलीला समजून घेणाऱ्या…
ती केवळ घर आणि ऑफिस यांच्यात नव्हे, तर अपेक्षा आणि स्वतःची ओळख यांच्यात संतुलन साधत असते आणि तरीही ती पुढे चालत राहते. कारण तिच्यासाठी जिद्द, कुटुंबाचा उत्कर्ष आणि यातील समतोल हा पर्याय नसून स्वभाव बनलेला आहे.
पण जिद्द म्हणजे सहनशीलता नव्हे. ताकद म्हणजे गप्प बसणं नव्हे. महाराष्ट्रातील अनेक महिलांसोबत काम करताना मला जाणवलं आहे की अनेक स्त्रिया मानसिक थकवा, भावनिक दुर्लक्ष, आर्थिक अवलंबित्व यांना “सामान्य” समजतात आणि यांच्या ओझ्याखाली कोमेजून जातात. कायद्याने दिलेले हक्क जसे की मालमत्तेतील समान हक्क, घरगुती हिंसाचारापासून संरक्षण, कार्यस्थळी सुरक्षितता या सर्वांची माहिती असूनदेखील अनेकदा त्या त्यांचा वापर करण्यास कचरतात कारण त्यांना घरातील शांतता टिकवायची असते. ही भावना नक्कीच स्तुत्य परंतु यांच्या अतिरेकातून एकलकोंडेपणा, जीवनाप्रती निराशा कधी जागा घेते हे कळत नाही. शांतता आणि संयम ही संकल्पना जितकी सुंदर आणि उदात्त आहे तितकीच ती कधी-कधी घातक ठरते कारण की असमतोलावर उभा असलेला शांततेचा पाया फार काळ टिकत नाही.
आज कायदा स्त्रीच्या समानतेला, तिच्या अधिकाराला मान्यता देतो. जसे की मुलींना पितृसंपत्तीत समान हक्क आहे. घरगुती हिंसाचाराविरोधात संरक्षण आहे. कार्यस्थळी लैंगिक छळाविरोधात कायदे आहेत. परंतु या सर्वांप्रती स्त्रियांची जागरूकता आणि तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आवश्यकता आहे. कायद्याने दिलेल्या संरक्षणाची जाणीव, त्याची योग्य अंमलबजावणी आणि त्याच्या प्रती समाज म्हणून जागरूकता निर्माण करणे हे आपले सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे.
“सहन कर” हे शिकवण्याऐवजी “उभं राहा” हे शिकवणं गरजेचं आहे. खरं सक्षमीकरण म्हणजे सर्व काही एकटीने पेलणं नव्हे, तर सर्वांनी मिळून जबाबदारी वाटून घेणं आहे.
पुण्यातील प्रत्येक घरात पालकत्व समान व्हावं. पत्नीची ओळख “साथीदार” म्हणून व्हावी, “अवलंबित” म्हणून नव्हे. स्त्रीच्या यशाचा अभिमान तितक्याच मोठ्या आवाजात व्यक्त व्हावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रीला अपराधीपणाशिवाय विश्रांती घेण्याचा अधिकार मिळावा. कारण सतत थकलेली स्त्री प्रगत समाज घडवू शकत नाही.
या महिला दिनी फक्त शुभेच्छा देऊन थांबू नये. फुले कोमेजतात, सोशल मीडियावरील पोस्ट्स विस्मरणात जातात. पण घरातील आणि समाजातील विचारसरणीत बदल झाला, तर तो कायम राहतो.
मुलींना स्वप्न पाहण्याची मोकळीक देऊया. मुलांना समानतेचे संस्कार देऊया. जबाबदाऱ्या लिंगभेदावर नव्हे, तर सामंजस्यावर आधारित अधोरेखित करूयात. स्त्रीच्या स्वप्नांना आपलेसे करूयात किंबहुना तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पण थोडे झिजूयात ही भावना हीच खरी आजच्या दिनी शुभेच्छा ठरेल.
आधुनिक भारतीय स्त्रीला विशेष सवलती नकोत. तिला भागीदारी, आत्मसन्मान आणि मायेचा हात हवा आहे. तिला त्यागासाठी टाळ्या नकोत तर तिला तिच्या निर्णय घेण्याचा अधिकार आणि आदर हवा आहे. आणि कदाचित तिच्यासाठी सर्वात मोठा सन्मान हा असेल की तिच्या सहनशक्तीचा गौरव करण्याऐवजी तिचं ओझं हलकं करण्याची तयारी दाखवणं.
“सक्षमीकरण म्हणजे स्त्री किती सहन करू शकते हे नाही; तर ती किती मोकळेपणाने जगू शकते, स्वप्न पाहू शकते आणि उंच भरारी घेऊ शकते याची खात्री देणं होय.”
——
एडव्होकेट शीतल सुंबरे, पुणे सत्र व मुंबई उच्च न्यायालय
Shetall.sumbre@gmail.com


More Stories
“सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाअंतर्गत तिसरी पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन; रन फॉर अमृतकालमध्ये १७ हजार धावपटू सहभागी
महिला दिनानिमित्त बावधन शाखेतील पेरिविंकल स्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी आरोग्य मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन!!!
पेरीविंकल शाळेच्या पिरंगूट शाखेत महिला दिनानिमित्त आरोग्य जागरूकता व्याख्यान संपन्न..