March 8, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूस शाखेच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महिला दिनानिमित्त विविधतेतील एकतेचा सुंदर आविष्कार!!!!

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल च्या सूस शाखेत ‘Unity in Diversity’ संकल्पनेवर महिला दिन उत्साहात साजरा”

सुस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सूस शाखेत विविधता में एकता म्हणजेच ‘Unity in Diversity’ संकल्पनेवर आधारित महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षकांसाठी आयोजित स्नेहसंमेलनाचा सर्वांनीच मनमुराद आनंद घेतला.

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेत “Unity in Diversity” या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. खास शिक्षकांसाठी महिला दिनाचे औचित्य साधून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचा प्रारंभ पारंपरिक सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी संस्थेचे माननीय संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल मॅडम , शिवानी मॅडम, प्राचार्या निर्मल पंडित मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत समन्वयक स्मिता श्रीवास्तव नेहा माळवदे व संपूर्ण शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली. 

महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम स्नेहसंमेलनाच्या धर्तीवर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शिक्षकांनी सादर केलेली राज्यनिहाय सांस्कृतिक सादरीकरणे. विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषा, नृत्यशैली आणि सांस्कृतिक परंपरांचे सुंदर सादरीकरण करत शिक्षकांनी भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडवले. या सादरीकरणांमधून “Unity in Diversity” या संकल्पनेचा प्रभावी संदेशही देण्यात आला. उपस्थित सर्वांनी या रंगतदार सादरीकरणांचा मनापासून आनंद घेतला.

या प्रसंगी माननीय अध्यक्ष राजेंद्र बांदल सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की आजच्या आधुनिक समाजात महिला प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. शिक्षण, विज्ञान, प्रशासन, उद्योग आणि समाजसेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.

शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला शिक्षक विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक प्रगतीसाठीच नव्हे, तर त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठीही मोठे योगदान देतात. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि सकारात्मक मूल्ये रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महिला शिक्षक करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तसेच महिलांमध्ये असलेली जिद्द, संयम, परिश्रमशीलता आणि नेतृत्वगुण हे समाजाला योग्य दिशा देणारे आहेत, असेही त्यांनी नमूद केले. समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचा सन्मान करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि समान संधी उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. शाळेतील महिला शिक्षकांचे समर्पण, मेहनत आणि कार्यतत्परता अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.

या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम शाळेतील पुरुष शिक्षकांनी पुढाकार घेऊन आयोजित केला होता. महिलांविषयी आदर, कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करण्याचा हा एक सुंदर आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला. या उपक्रमामुळे शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकीचे आणि स्नेहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन H.O D.सचिन खोडके यांनी अत्यंत उत्साही आणि प्रभावी पद्धतीने केले . विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. शिक्षकांनी सादर केलेल्या कलागुणांमुळे उपस्थित सर्वांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या कार्याचा गौरव करत सर्वांनी महिलांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली. महिला दिनाचा हा उत्सव केवळ एक कार्यक्रम न राहता शाळेच्या कुटुंबात स्नेह, एकात्मता आणि परस्पर आदराची भावना अधिक दृढ करणारा ठरला. या कार्यक्रमामुळे महिलांविषयी आदर, अभिमान आणि कृतज्ञतेची भावना सर्वांच्या मनात अधिक बळकट झाली.