April 10, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

वाढीव वीजबिल तसेच मिळकतकर कमी करा भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांची मागणी

पुणे :

राज्य सरकारने निवासी मिळकतींना आकारण्यात येणाऱ्या करामध्ये ४०टक्के सवलत कायम ठेवली आहे. मात्र तरीही नागरिकांना पुणे महापालिकेकडून मिळकतकर वाढून येत आहे. त्याचप्रमाणे सध्या महावितरणकडून ग्राहकांना वीजबिल वाढून येत आहे. याबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी यासाठी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार तसेच महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना निवेदन दिले.

 

याबद्दल माहिती देताना सुनील माने यांनी सांगितले की, महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये पुणे महानगरपालिकेकडून निवासी मिळकतींना स्ववापराकरता देण्यात येणारी ४० टक्के सवलत राज्य शासनाने कायम केली आहे. मात्र पुणे महापालिकेकडून या मिळकतीना सवलत न देता नागरिकांना भरमसाठ बिले पाठवण्यात आली आहेत. या बाबत माझ्या संपर्क कार्यालयात मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

वाढीव वीजबिले तसेच मिळकतकर वाढवून आलेल्या नागरिकांनी आमच्या संपर्क कार्यालयात बिले येत्या आठ दिवसांत जमा करावी – सुनील माने (भाजप पुणे शहर चिटणीस)

त्याचप्रमाणे सध्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर वाढीव वीजबिले येत असल्याबाबतच्या अनेक तक्रारी येत आहेत. सदोष लाईट मीटर अथवा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा याला जबाबदार असण्याची शक्यता आहे. याबाबत आपण चौकशी करावी. तसेच महावितरणकडून विनाकारण वाढीव वीज बिल आल्यास, त्याच्या विरोधात ग्राहकांना दाद मागता यावी, यासाठी हा ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच कार्यरत आहे. विनाकारण वीजबिल वाढून आल्यास ग्राहक या मंचाकडे कार्यालयात तक्रार करू शकतात. या तक्रारींवर मंचापुढे रीतसर सुनावणी घेतली जाते. मात्र या मंचाचे कामकाज करण्यासाठी महावितरण कंपनीने पूर्णवेळ कुशल कर्मचारी उपलब्ध करून दिले नसल्याने पुणे परिमंडळाच्या अध्यक्षांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी या निवारण मंचाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे पुणे शहरातील प्रलंबित दाव्यांची संख्या ही वाढत आहे. याबाबत चौकशी करून योग्य कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.