September 8, 2024

Samrajya Ladha

पुण्यातील २२ अंध विद्यार्थ्यांची एक अनोखी हिमालय सफर

पुणे :

पुण्यातील सामाजिक संस्था स्वरुपसेवा, अग्रगण्य गिर्यारोहण संस्था गिरिप्रेमी आणि लव्ह केअर शेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ममता अंध अनाथ कल्याण केंद्र या संस्थेतील २२ अंध विद्यार्थ्यांची एक अनोखी हिमालय सफर आयोजित करण्यात आली होती. ही मोहीम व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी तीनही संस्थांमधील १४ स्वयंसेवकांनी आपले योगदान दिले. या सात दिवसांच्या हिमालय सफरीसाठी गेलेला सर्व संघ गुरूवारी सुखरूप पुण्यात परतला. अंध तरुणांची हिमालय सफर या उपक्रमा अंतर्गत सर्व अंध विद्यार्थ्यांनी प्रथमच हिमालयातील हिमाचा अनुभव घेतला.

 

या आगळ्या वेगळ्या हिमालय सफारीसाठी १७ मे रोजी सर्व संघ रेल्वेने दिल्लीला रवाना झाला होता. पुढील
प्रवासादरम्यान या सर्व संघाने नुकताच प्रदर्शित झालेला श्रीकांत हा एका अंध तरुणाच्या साहसी जीवनावर आधारित चित्रपट अंबाला येथील चित्रपट गृहात जाऊन पहिला (ऐकला). श्रीकांत बोला या तरुणाने आपण अंध असूनही कशा प्रकारे एक वेगळी उंची गाठली हे या चित्रपटातून या तरुणांनी हे जाणले.

१९ मे च्या पहाटे सर्व संघ हिमाचल प्रदेश येथील सांस्कृतिक वारसा असलेल्या नग्गर गावातील अप नॉर्थ या कॅम्प साईटवर पोहचला. याच दिवशी संध्याकाळी सर्व संघाने जवळच असलेल्या टिल्ला शारनी हा छोटासा ट्रेक केला. या दरम्यान सर्व मुलांनी हिमालयातील वेगाने बदलणाऱ्या हवामानाचाही अंदाज घेतला. तसेच या सर्व मुलांनी कॅम्प साईटवरील स्थानिक लोकांसोबत गप्पा मारल्या, तिथली जीवन पद्धती, संस्कृती, राहण्याच्या व खाण्याच्या पद्धती जाणून घेतल्या. याचसोबत गिरिप्रेमी संस्थेच्या १९ मे २०१२ साली यशस्वी झालेल्या माऊंट एव्हरेस्ट या भारतातील सर्वात मोठ्या नागरी मोहिमेला १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एव्हरेस्ट शीखरवीर भुषण हर्षे यांनीही या तरुणांना एव्हरेस्ट मोहीम सावादांच्या माध्यमातून उलगडून सांगितली. २० मे रोजी संपूर्ण संघाने मनाली जवळील अटल बोगदा पार
करून ११,००० फूट उंचीवरील खोक्सर या ठिकाणी हिमाचा आनंद लुटला. अटल बोगदा हा १०,००० फूट उंचीवरील जगातील सर्वात लांब बोगदा असल्याने या विद्यार्थ्यांना या बोगद्याचे भारतीय लष्कराच्या व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व सांगण्यात आले. २१ मे रोजी या सर्व संघाने मनाली जवळील क्लाथ या गावातील बियास नदीच्या काठावर असलेल्या नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडांमध्ये अंघोळी केल्या. या गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असल्याने हे पाणी औषधी मानले जाते. यानंतर तिथल्या स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन मनाली मार्केट येथे फेरफटका मारला.

२२ मे रोजी संघ पुन्हा परतीच्या प्रवासाला लागला. यापूर्वी अप नॉर्थ या कॅम्प साईटचे संचालक श्री. चंदन शर्मा यांनीही या तरुणांसोबत बऱ्याच गप्पा मारल्या व निघताना हिमाचल प्रदेशच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या पहाडी टोप्या सर्वांना भेट म्हणून दिल्या. ही भेटवस्तू सर्वांना नेहमीच या अनोख्या हिमालय सफरीची आठवण करून देत राहील असे श्री शर्मा यांनी सांगितले. संपूर्ण सफरी दरम्यान स्वयंसेवक आणि मुलांचे सुद्धा एक वेगळेच नाते तयार झाले होते त्यामुळे परतीच्या लांब पल्ल्याचा प्रवासही रेल्वे मधील गमती-जमतींमध्ये सहज पूर्ण झाला..

या अनोख्या प्रकारच्या हिमालय सफरीचे संपूर्ण नियोजन स्वरुपसेवा व गिरिप्रेमी संस्थेचे सदस्य श्री. सुयश मोकाशी यांनी केले होते. श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार पुरस्कृत ज्येष्ठ गिर्यारोहक श्री. उमेश झिरपे व स्वरुपसेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. अजित पटेल यांनी या सर्व मोहीमेकरिता मार्गदर्शन केले होते. लव्ह केअर शेअर फाऊंडेशनचे संस्थापक श्री. पीयूष शाह व ममता अंध अनाथ कल्याण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष श्री. तुषार कांबळे यांनीही या मोहिमेत मोलाचे योगदान दिले. याचसोबत स्वरुपसेवा संस्थेचे कौस्तुभ ठकार, शेखर चंद्रचुड, अजित ताटे, कौशल पोहेकर, गिरिप्रेमी संस्थेचे शशिकांत सोमण, अतुल मुरमुरे, रेखा जोशी, गिरिराज समेळ, जयसिंह देशमुख, शंकर ठाकुर, केतन पवार, ओंकार लेले; लव्ह केअर शेअर फाऊंडेशनचे आकाश भालिया, निखिल कुचेकर या तीनही संस्थांच्या स्वयंसेवकांनी ही मोहीम यशस्वी करण्याची मोठी कामगिरी पार पडली.

या संपूर्ण सफरी दरम्यान आलेले वेगवेगळे अनुभव, नैसर्गिक बर्फाचा आनंद, हिमालयाचे भारतीयांसाठीचे महत्त्व, सुमारे ४५०० किलोमीटरचा प्रवास, हिमालयातील थंड वातावरणाचा, तसेच तिथल्या स्थानिक संस्कृति व खाद्य संस्कृतीचा अनुभव, श्रीकांतसारख्या एका धाडसी अंध तरुणाची कथा, नवनवीन गोष्टींची माहिती या विद्यार्थ्यांना
मिळाली. ही हिमालय सफर नक्कीच या तरुणांच्या पुढील वाटचालीसाठी ऊर्जादायक ठरेल अशी खात्री आहे. अनेक गिर्यारोहक, साहसप्रेमी आणि सामाजिक भान असलेल्या समाजप्रेमींच्या आर्थिक योगदान व सदिच्छांमुळेच हे शक्य झाले आहे.