July 27, 2024

Samrajya Ladha

पुणे महापालिकेने करावयाच्या पावसाळा पूर्व कामांसंदर्भात मुरलीधर मोहोळ यांचे पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन..

पुणे :

पुणे महापालिकेने करावयाच्या पावसाळा पूर्व कामांसंदर्भात मुरलीधर मोहोळ, सरचिटणीस, भाजप, महाराष्ट्र प्रदेश यांनी डॉ. राजेंद्र भोसले,आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना निवेदन देऊन तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली.

 

गेल्या आठवड्याभरात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहराच्या विविध भागांतील रस्ते जलमय होत आहेत. त्यामुळेच महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी करावयाची 90 टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा चुकीचा आणि पुणेकरांची दिशाभूल करणारा वाटतो. आपण स्वतः प्रशासनासह नाल्यांवर जाऊन प्रत्यक्ष पाहाणी करावी, अशी विनंती आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत.

शहर आणि उपनगरातील नाले सफाई, कल्व्हर्ट आणि पावसाळी गटारांच्या सफाईच्या कामांची मुदत 15 मे पर्यंत निश्चित करण्यात आली होती. आतापर्यंत 90 टक्के पावसाळी कामे पूर्ण झाल्याचा दावा नुकताच प्रशासनाने केला. परंतु शहरात मागील आठवड्याभरात झालेल्या पावसाने रस्ते जलमय होत आहेत. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने पुणेकरांची गैरसोय होत आहे. नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने झाली नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

हवामान खात्याने या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाजे व्यक्त केला आहे. तसेच गेल्या काही वर्षांत कमी वेळात ढगफुटी सदृश्य अधिक पाऊस होत आहे. पावसाळी गटारांची वहनक्षमता कमी असल्याने पाणी वाहून जाण्याला मर्यादा येतात. शहरात पाचशे किलोमीटर लांबीचे छोटे-मोठे ओढे आणि नाले आहेत. या नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई झालेली नाही.

या बरोबर पुढील काही उपाययोजना अल्प आणि दीर्घ कालावधीसाठी करणे आवश्यक वाटते, त्याची सविस्तर माहिती द्यावी

1. पावसाचे पाणी वाहून नेणारी पावसाळी गटारे आणि नाले पाचशे किलोमीटरची आहेत. शहराला किमान 800 किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांची आवश्यकता आहे. त्या बाबत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत?
2. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये नालेसफाई आदी पावसाळा पूर्व कामांची स्थिती काय आहे?
3. केंद्र शासनाकडून पुणे शहराला अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंटअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला असल्यास, या योजनेतील कामांची सद्यस्थिती काय आहे?
4. पूरस्थिती निवारणासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पुणे पोलीस, महामेट्रो, बीएसएनएल आदी विभागातील अधिकारी, पदाधिकारी, अभियंता, अधीक्षक आदींची एकत्रित बैठक घेऊन नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास खबरदारी म्हणून आदर्श कार्यप्रणाली एसओपी तयार केली आहे का?
5. आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिकेचा आपत्ती निवारण कक्ष सुसज्ज आहे का आपत्ती निवारण कक्षात कोणकोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे?
6. संभाव्य पूरस्थितीचा विचार करून शहरात प्रभाग स्तरावर मदत केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे का?
7. पाच वर्षांपूवी ढगफुटी सदृश पावसामुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. या परिसरात पूर नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत?
8. राज्य शासनाकडून सीमा भिंतींसाठी प्राप्त झालेल्या 200 कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांची सद्यस्थिती काय आहे?
9. शहरातील पूरस्थितीचा विचार करून 128 ठिकाणांवरील उपाययोजनांचा आराखडा सी-डॅकच्या मदतीने तयार करून 432 कोटी रुपयांचा आपत्ती व्यवस्थापन कामांचा अहवाल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास सादर करण्यात आला होता. त्याची सद्यस्थिती काय आहे?
10. पावसाळी कोंडीच्या 200 हून अधिक चौकांमध्ये कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत?

वरील सर्व विषय अत्यंत महत्त्वाचे आणि गंभीर असून, या बाबतची माहिती तातडीने देऊन, योग्य त्या उपायययोजना कराव्यात, अशी विनंती निवेदनात मोहोळ यांनी केली आहे.

 

You may have missed