November 21, 2024

Samrajya Ladha

डीजे, लेझरविरोधी भूमिकेबद्दल सुनील माने यांना धमकी…

परशुराम वाडेकर यांच्यासह तिघांविरोधात तक्रार.

पुणे :

सर्वसामान्यांचे आयुष्य वेठीस धरणाऱ्या डीजे आणि लेझर विरोधात ठोस भूमिका घेत कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी नुकतीच जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला होता. अनेक स्तरातून याचे स्वागत होत असतानाच काही अपप्रवृत्तींनी मात्र समाज माध्यमातून माने यांना धमक्या दिल्या. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून आज पत्रकार परिषद घेत सुनील माने यांनी ही बाब उघडकीस आणली.

यावेळी माने म्हणाले, मला जीवे मारणे, काळे फासणे, नग्न धिंड काढणे अशा धमक्या आल्या असून या प्रकरणी मी आज पुणे पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, झोन चार चे पोलीस उपायुक्त यांची भेट घेतली. त्यांनी मला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून मी या प्रकरणी आरपीआयचे परशुराम वाडेकर, सुशील सर्वगौड, नागेश भोसले, सचिन गजरमल यांच्या विरोधात पुराव्यासह तक्रार दाखल केली.

ते पुढे म्हणाले की, हल्ली महापुरुषांची जयंती साजरी करताना तसेच सण उत्सवांमध्ये डीजे आणि लेझर लावण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. मात्र यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवात याचे दुष्परीणाम दिसून आले. डीजेमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागाला. काहींना कायमचे बहिरेपण आले. तर लेझर मुळे अनेकांची दृष्टी गेली. यामुळे डीजे आणि लेझरवर बंदी घालावी, अशी भूमिका मी जाहीर केली. याबाबत मी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले हेही माझ्या सोबत आहेत. ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही याचिका आम्ही दाखल करणार आहोत.

सर्वच महापुरुषांच्या जयंतीत अथवा सर्वच सणांच्या वेळी होणाऱ्या या विकृतीकरणाच्या विरोधात माझी भूमिका आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारविचारांचा मी पाईक आहे. ते माझे प्रेरणास्थान असून त्यांची जयंती उत्साहात साजरी होण्याच्या विरोधात माझी भूमिका नाही. उलट बाबासाहेबांची जयंती वेगळ्या संकल्पना राबवून साजरी करण्याची तयारी आम्ही आत्तापासूनच सुरू केली आहे.

मात्र स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेणाऱ्या काही नेत्यांची काही दिवसापूर्वी आंबेडकर स्मारक भवन येथे बैठक घेतली. या बैठकीत मी डीजे आणि लेझर विरुद्ध भूमिका घेतल्याने मला जीवे मारण्याची, मला नग्न करून माझी धिंड काढण्याची, मला मारणे अशी धमकी देत इतर लोकांनाही प्रवृत्त केले. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याच्या विरोधात आहे. असा गैरसमज ते समाज माध्यमांद्वारे पसरवत आहेत.

मी बाबासाहेबांची जयंती जल्लोषात साजरी करण्याच्या विचारांचा आहे. मात्र बाबासाहेब फार मोठे विचारवंत होते त्यामुळे त्यांची जयंती वैचारिक पद्धतीने सर्वसामान्यांना मदत करून साजरी करण्याच्या विचारांचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदा पुण्यातील औंध भागातील चिखलवाडी येथे साजरी करण्यात आली. हे सर्वात प्रथम मी शोधून काढले. येथे बाबासाहेबांचे स्मारक व्हावे व चिखलावडीच्या आसपासच्या परिसराचा पायाभूत सुविधासह विकास व्हावा अशी विंनती मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. न्यायालयात शपथ घेण्यासाठी संविधानाचा ही वापर व्हावा यासाठी मी न्यायालायात जनहित याचिका दाखल केली होती, पुण्यात गौतम बुद्धांच्या २५५० व्या महापरीनिर्वान दिनाबद्दल दलाई लमांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमा घेण्यात आला होता, याचे संयोजन मी केले होते. बोपोडीत बाबासाहेबांचा पुतळा प्रस्तावित आहे. यासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मी प्रशासनाकडे केली आहे. अशा प्रकारे अनेक समजपयोगी कार्यक्रम मी राबवत असतानाही ही अशा प्रकारे धमक्या दिल्या जात असतील तर अशा धमक्यांना मी भिक घालत नाही. या धमक्यांना न घाबरता आजही मी या विचारांवर कायम आहे. या पुढेही उत्सवांचे विकृतीकरण थांबवण्यासाठी वैचारीक आणि संविधाणीक मार्गाने प्रयत्न करत राहणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.