September 8, 2024

Samrajya Ladha

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तयार करण्यात आलेल्या ७५ व्हर्च्युअल क्लासरुम/ स्मार्टरुमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई :

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तयार करण्यात आलेल्या ७५ व्हर्च्युअल क्लासरुम/ स्मार्टरुमचे मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात राज्यात ७५ व्हर्च्युअल क्लासरूमचा शुभारंभ करण्यात आला असून राज्यात एकूण ९० क्लासरूम तयार आहेत. या क्लासरूममध्ये इंटरअँक्टिव पॅनल ,संगणक सेवा, उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्किल इंडिया व डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आता व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात येत आहेत, ‘कुशल महाराष्ट्र ; रोजगारयुक्त महाराष्ट्र’ करण्याचा केलेल्या संकल्पाची पूर्ती करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्य शासनाने एक वर्षात ७५ हजार नोक-या देण्याचा संकल्प सुरू केला असून प्रत्यक्ष नियुक्तीपत्र देण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम घेतला आहे. अधिसंख्य पदाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यामध्ये उद्योग आणण्यासाठी ६०० सामंजस्य करार करण्यात आले असल्याचे सांगतानाच देशाला विकसित करण्यासाठी कौशल्य विकास विभागाचे मोठे योगदान असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आयुक्त डॉ रामास्वामी उपस्थित होते तर विविध लोकप्रतिनिधींसह संबंधित आयटीआयचे प्रशिक्षणार्थी दुरदृश्य प्रणालीव्दारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.