September 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध-बाणेर लिंक रोडवर गाय चेंबरमध्ये पडली; नागरिकांच्या मदतीने सुटका

औंध :

रविवार, दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास औंध-बाणेर लिंक रोडवरील एका पावसाळी गटाराच्या चेंबरमध्ये एक गाय पडल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या मदतीमुळे गाईला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

 

घटनेची माहिती मिळताच, नाना वाळके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत स्थानिक नागरिकही मदतीसाठी पुढे आले. औंध येथील प्राणीमित्र हेमंत शेळके यांनीही या बचावकार्यात मोलाची साथ दिली. सर्वांच्या प्रयत्नाने गाईला चेंबरमधून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले.

या घटनेमुळे बाणेर-औंध परिसरातील पावसाळी गटारांच्या झाकणांच्या निकृष्ट दर्जाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी गटारांची झाकणे सातत्याने तुटत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. वारंवार मागणी करूनही महानगरपालिकेकडून वेळेवर दुरुस्ती केली जात नसल्यामुळे असे अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या संदर्भात, नाना वाळके यांनी महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत आहे. निकृष्ट दर्जाची कामे आणि दुरुस्तीतील दिरंगाई यामुळे असे जीवघेणे अपघात घडत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात,” असे मत नाना वाळके यांनी व्यक्त केले.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, महानगरपालिकेने पावसाळी गटारांच्या झाकणांच्या गुणवत्तेकडे लक्ष देऊन त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.