July 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुस मधे भोंदू बाबाचा अजब प्रताप, पोलिसांनी फसवणूक प्रकरणी केली अटक…

सुस :

सूस येथील एका मठातील प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार (वय २९, रा. सूसगाव, ता. मुळशी) या भोंदूबाबाला भक्तांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तामदार याने भक्तांच्या खासगी क्षणांचे चित्रीकरण करण्यासाठी त्यांच्या परवानगीशिवाय मोबाईलमध्ये ‘एअर ड्रॉइड किड’ (Air Droid Kid) नावाचे ॲप डाऊनलोड करून त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवले होते. या प्रकरणी एका ३९ वर्षीय भक्ताने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नेमका प्रकार काय घडला?
तामदार हा सूस येथील मठात स्वतःला दिव्यशक्ती प्राप्त झाल्याचा दावा करत होता. तो भक्तांना “तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यांत अटळ आहे” असे सांगून मानसिक खच्चीकरण करत असे. त्यानंतर मंत्रजाप करण्याच्या बहाण्याने त्यांना एकांतात बसवून, त्यांचे मोबाईल घेऊन त्यांच्या नकळत ‘एअर ड्रॉइड किड’ हे ॲप डाऊनलोड करत असे. हे ॲप मोबाईलच्या बॅकग्राऊंडमध्ये चालू राहिल्याने तामदारला भक्तांच्या कॅमेरा, आवाज आणि ठिकाणावर थेट नियंत्रण मिळवता येत असे. या ॲपच्या मदतीने तो भक्तांना फोन करून त्यांनी कोणते कपडे घातले आहेत, कुठे आहेत, दिवसभरात काय केले याची माहिती सांगत असे, ज्यामुळे भक्तांचा त्याच्यावर विश्वास बसत गेला.
शारीरिक संबंध आणि खासगी चित्रीकरण
मृत्यूपासून सुटका मिळवण्याचा उपाय विचारल्यास, हा भोंदूबाबा तरुण भक्तांना प्रेयसी किंवा वेश्यांशी शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला देत असे. इतकेच नाही, तर संबंध सुरू असताना मोबाईलचे दिशादर्शक चालू करून मोबाईल कॅमेऱ्यातून त्यांच्या खासगी क्षणाचे चित्रीकरणही करत असे.

गैरप्रकार कसा उघडकीस आला?
एका तरुण भक्ताचा मोबाईल नेहमी गरम होत असल्याने त्याने तो माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मित्राकडे तपासणीसाठी दिला. मित्राने मोबाईल तपासला असता त्यात एक संशयास्पद गुप्त (हिडन) ॲप आढळले. या ॲपद्वारे इतर कोणीतरी मोबाईल बाहेरून नियंत्रित करत असल्याचे स्पष्ट झाले. हा मोबाईल केवळ बाबाच्याच हातात दिल्याचे लक्षात आल्यानंतर त्या तरुणाने इतर काही भक्तांशी संपर्क साधला. त्यांच्याही मोबाईलमध्ये तेच ॲप असल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर भक्तांनी एकत्र येत बाबाला जाब विचारला असता, त्याची घाबरगुंडी उडाली आणि त्याने तक्रार न करण्याची विनंती केली. मात्र, ही माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांची कारवाई
माहिती मिळताच बावधन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार याला ताब्यात घेतले. शुक्रवारी (२८ जून) रात्री बावधन पोलिस ठाण्यात अनेक भक्त जमा झाले होते आणि अनेकांनी आपल्यासोबतही असाच प्रकार घडल्याचे पोलिसांना सांगितले.

सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपीच्या मोबाईल आणि वापरलेल्या ॲपची कसून चौकशी करण्यात आली. भक्तांनी केलेले आरोप खरे ठरल्याने भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रीकरण कुठे साठवले जात होते, याचा शोध घेण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बावधन पोलिस करत असून, असा प्रकार घडलेल्या इतर कोणाही नागरिकांनी बावधन पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विधाते यांनी केले आहे.

You may have missed