औंध :
औंध, औंधरोड, खडकी, बोपोडी परिसरात रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे तातडीने बुजवावेत तसेच जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील ड्रेनेजला खराब झाकणे लावली आहेत. ही झाकणे त्वरित बदलावीत अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सुनील माने यांनी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी आज दिले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खडकी स्टेशन, खडकी पोलिस स्टेशन जवळील अंडरपास, बोपोडी येथील हॅरिसब्रिजखाली मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे ब्रेमेन चौक, औंधरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यांसह बहुतांश सिग्नलवर खड्डे पडले आहेत. खड्यांमुळे सिग्नलवर वाहनांचा वेग मंदावल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे लोकांचा वेळ वाया जात आहे. त्याचप्रमाणे लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे.
त्याचप्रमाणे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर सह्याद्री हॉस्पिटल ते बोपोडी मेट्रो स्टेशन दरम्यान असणाऱ्या ड्रेनेजची झाकणे अत्यंत खराब आहेत. यावरून वाहने गेल्यानंतर सातत्याने ही झाकणे तुटत आहेत. अशाप्रकारे झाकणे तुटून कदाचित मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. ही झाकणे चांगल्या प्रतीची लावणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे खराब झाकणे लावून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी याची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
More Stories
बाणेर-बालेवाडीचा एवढा विकास कोणी केला ? – जयेश मुरकुटे यांचा सत्ताधाऱ्यांना उपरोधिक सवाल
वृक्षारोपण काळाची गरज: अध्यक्षा सौ. किरण गुडदे
बाणेर येथील सोसायट्यांच्या समस्या सोडवल्याबद्दल चांदेरे कुटुंबाचा सत्कार!