पौड, २१ जून २०२५ :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पौड शाखेत आज, शनिवार, २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी योगाचे महत्त्व आणि त्याचे फायदे जाणून घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. या प्रसंगी संस्थेच्या संस्थापक-संचालिका शिवानी बांदल, शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा कदम, तसेच योग प्रशिक्षक ब्रह्मकुमारी ज्योती दीदी आणि ब्रह्मकुमारी सुमती दीदी उपस्थित होत्या.
ज्योती दीदी आणि सुमती दीदी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. योग आणि प्राणायाम हे मन निरोगी ठेवण्याचे प्रभावी मार्ग आहेत, हे त्यांनी पटवून दिले. योगासनांचे फायदे आणि योगाद्वारे निरोगी जीवन जगण्याचा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी मुद्रासन, भस्त्रिका प्राणायाम यांसारखी विविध योगासने करून घेतली आणि योगामुळे मिळणारे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक फायदे सविस्तरपणे सांगितले.
संस्थेच्या संचालिका शिवानी बांदल आणि मुख्याध्यापिका वीणा कदम यांनीही विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. शिवानी बांदल यांनी विद्यार्थ्यांना दररोज योगा करण्याचे आवाहन केले. योग शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्य सुधारण्यास कशी मदत करतो, हे त्यांनी सांगितले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकवृंदांनी योग प्रतिज्ञा घेतली. आजपासून दररोज सकाळी योगसाधना आचरणात आणण्याचा संकल्प सर्वांनी केला. योग प्रशिक्षकांनी योग प्रशिक्षण आणि निरोगीपणा यांचा संबंध अतिशय सहजपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व आणि त्याचे दैनंदिन जीवनातील फायदे चांगल्या प्रकारे समजले.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन