October 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी ते कस्पटेवाडी वाकडला जोडणाऱ्या व पुणे महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे रखडलेल्या पुलाची दसऱ्याच्या मुहूर्तावर पूजा करून स्वाभिमानी पक्षाने व्यक्त केला निषेध!

बालेवाडी :

दसऱ्याच्या मुहूर्तावर बालेवाडी येथील पुणे महानगरपालिका हद्दीत असलेल्या आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कस्पटेवाडीला जोडणाऱ्या काम रखडलेल्या पुलाची पूजा करून स्वाभिमानी पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेचा जाहीर निषेध करण्यात आला. गेल्या १४ वर्षांपासून हा पूल नागरिकांच्या वापराविना पडून असून, कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही त्याचा उपयोग होत नसल्याचा आरोप स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर यांनी केला.

स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा निषेध आंदोलन करण्यात आले. पुलाचे काम पूर्ण झाले असतानाही संबंधित रस्त्याचा विकास आराखडा (डीपी प्लॅन) बदलल्यामुळे हा पूल वापराविना पडून राहिला आहे. या प्रक्रियेत शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या जमिनी गेल्या असून, संबंधित शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आलेला नाही, असा आरोप प्रकाशतात्या बालवडकर यांनी केला. या प्रश्नावर प्रशासनाकडून कोणताही ठोस तोडगा काढण्यात येत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

पुलाचा वापर गैरकृत्यांसाठी होत असल्याचा आरोप

पुलाचा नागरिकांना वाहतुकीसाठी उपयोग होत नसताना या ठिकाणी राडारोडा टाकणे, वाहनांचे पार्किंग करणे, मद्यपानासाठी बसणे, तसेच जुगार आणि इतर अनैतिक प्रकार सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. पुलाच्या दुरवस्थेमुळे आणि या ठिकाणी सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांमुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दसऱ्याच्या मुहूर्तावर पुलाची पूजा करून तो नागरिकांच्या वापरासाठी निरुपयोगी ठरल्याचे प्रतीकात्मकरीत्या दाखविण्यात आले. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत या पुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींचा योग्य मोबदला द्यावा आणि पुलाच्या परिसरातील गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महानगरपालिका क्षेत्रांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधेची अशी अवस्था होणे ही प्रशासनासाठी गंभीर बाब असल्याचे मत प्रकाशतात्या बालवडकर यांनी व्यक्त केले.

या आंदोलनावेळी हनुमंत बालवडकर, लक्ष्मण पाडळे, अशोक तात्या बालवडकर, आनंद कांबळे (पोलीस पाटील), संदीप गु. बालवडकर, नरेंद्र बालवडकर, चंद्रशेखर बालवडकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

You may have missed