October 20, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*पेरीविंकल बावधन व सुस शाखेत दांडियाच्या ठेक्यावर थिरकले विद्यार्थी, पालक अन् शिक्षक; ‘दांडिया ईव्ह २०२६’चा बावधन व सूस नगरीत जल्लोष!*

सुस : 

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या बावधन व सुस शाखांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित ‘दांडिया ईव्ह २०२६’ हा सोहळा पारंपरिक वेशभूषा, गरबा-दांडियाचा ताल आणि उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात साजरा करण्यात आला*. भारतीय संस्कृतीचे जतन, सामाजिक एकोपा, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन आणि उद्योजकीय कौशल्यांचा विकास या उद्देशांनी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख, दांडियाच्या काठ्यांचा लयबद्ध नाद, संगीताच्या तालावर थिरकणारी पावले आणि सर्वत्र पसरलेला उत्साह यांमुळे शालेय परिसर नवरात्रोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. ज्ञान, संस्कार आणि सकारात्मकतेचे प्रतीक असलेल्या या मंगलारंभानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ रेखा बांदल, शिवानी बांदल, यश बांदल आणि शाळेच्या प्रमुख प्राचार्या सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्या हस्ते आणि सन्माननीय उपस्थितीत माँ दुर्गा ला वंदन करून माँ दुर्गाची आरती करून दांडिया इव्ह चे ओपनिंग करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये महिला सुरक्षा, सामाजिक सजगता आणि जबाबदार नागरिकत्व यांविषयी जागरूकतेचा संदेश पोहोचला.
शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मनोरंजनासोबत सामाजिक मूल्यांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरले ते गरबा-दांडियाचे रंगतदार सादरीकरण. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेत दांडियाच्या तालावर आनंद लुटला. पारंपरिक वेशभूषेतील रंगांची उधळण, संगीताचा ठेका आणि समूह नृत्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला. विविध समूहांच्या नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून त्यांचा आत्मविश्वास, कलात्मकता, तालबद्धता आणि संघभावना दिसून आली. गरबा-दांडियाच्या माध्यमातून भारतीय परंपरेतील सामूहिक आनंद, सांस्कृतिक एकात्मता आणि परस्परांतील स्नेह यांचे सुंदर दर्शन घडले.

शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून नवरात्रीच्या पवित्र सणाचे महत्त्व विशद केले. देवीच्या नऊ रूपांचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी गरबा आणि दांडिया हे केवळ नृत्याचे प्रकार नसून, ते आदिशक्ती देवीप्रती श्रद्धा, भक्ती आणि समर्पण व्यक्त करण्याचे माध्यम असल्याचे सांगितले. या पारंपरिक नृत्यप्रकारांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि परंपरांचे जतन व संवर्धन होणे आवश्यक असल्याचे नमूद करून, हा उत्सव आनंदासोबतच सांस्कृतिक मूल्ये आणि शिस्त यांचे भान राखून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

‘दांडिया ईव्ह २०२६’चे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी उभारलेले विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स. वडापाव, पाणीपुरी, सँडविच, साबुदाणा वडा, दहीवडे, भेळ, मोमोज आणि पॉपकॉर्न यांसारख्या खाद्यपदार्थांची रेलचेल या स्टॉल्सवर पाहायला मिळाली. पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्थाही करण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचे उद्घाटन करण्यात आले. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी विविध पदार्थांचा आस्वाद घेत स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी केलेली मांडणी, नियोजन आणि ग्राहकांशी साधलेला संवाद यांमुळे या उपक्रमाला विशेष रंगत आली.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून व्यावहारिक शिक्षण मिळाले. स्टॉल्स उभारणे, पदार्थांची निवड करणे, आवश्यक साहित्याचे नियोजन, आर्थिक व्यवहार सांभाळणे, ग्राहकांशी संवाद साधणे आणि सहकाऱ्यांसोबत समन्वय राखणे अशा विविध बाबींचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. यामुळे आर्थिक व्यवहारांची प्राथमिक समज, निर्णयक्षमता, जबाबदारी, नेतृत्व आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली. पुस्तकातील ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि ज्ञानवर्धक ठरला.

कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉच्या विविध फेऱ्यांनी उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण केली. प्रत्येक फेरीतील विजेत्यांच्या घोषणेमुळे कार्यक्रमातील आनंद द्विगुणित झाला. अंतिम फेऱ्या, विजेत्यांची घोषणा आणि पारितोषिक वितरणामुळे सोहळ्याला आणखी रंगत आली. गरबा-दांडियाचा जल्लोष, समूह नृत्यांचे सादरीकरण, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि लकी ड्रॉ अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमातील प्रत्येक क्षण संस्मरणीय बनवला. विद्यार्थी आणि पालकांनी या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.

सुस शाखेच्या दांडिया ईव्हचे विशेष आकर्षण म्हणजे नवदुर्गेच्या नऊ रूपांपैकी कालरात्री देवीच्या वेशभूषेत साकारलेल्या विद्यार्थिनीचा भावपूर्ण आणि देखणा नृत्याविष्कार ठरला. देवीच्या सामर्थ्याचे, शौर्याचे आणि दिव्य शक्तीचे दर्शन घडवणाऱ्या या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा, भक्तिमय वातावरण आणि नृत्यातून साकारलेली देवीची शक्तिरूप प्रतिमा यांमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच आध्यात्मिक उंची प्राप्त झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सूरज साठे, अक्षय कबाडे, समीर जेधे, ज्ञानेश्वर मोरे, कला शिक्षक शिवराज कदम, नीता पवार, प्राजक्ता पिल्ले व सर्व पर्यवेक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यांनीही आयोजन व व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावली. सायली गायकवाड यांनी सर्व लाईट व्यवस्था यात वैयक्तिक लक्ष देऊन सुंदर व्यवस्थापन केले. सर्व पर्यवेक्षक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परस्पर सहकार्याने विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. सामूहिक नियोजन, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि समन्वय यांच्या बळावर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल, संस्थापिका सौ. रेखा बांदल आणि संचालिका कु. शिवानी बांदल तसेच सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.शाळेच्या प्रमुख प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनामुळे व शिस्तबद्ध नियोजनामुळे कार्यक्रमाच्या नियोजनाला दिशा मिळाली.

उपमुख्याध्यापिका सौ. योगिता ढाणे, ज्युनिअर कॉलेजचे एच.ओ.डी. श्री. सचिन खोडके आणि पर्यवेक्षिका सायली गायकवाड, शिरीन काझी व सौ. नेहा माळवदे यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्या सहभागामुळे या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पेरीविंकल समूहाच्या शैक्षणिक दृष्टिकोनात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. अभ्यासक्रमासोबतच सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि अनुभवाधारित शिक्षण यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो. ‘दांडिया ईव्ह २०२६’ हा त्याच दृष्टिकोनाचा प्रत्यय देणारा उपक्रम ठरला. भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या या सोहळ्यात गरबा-दांडियाच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरेचा आनंद, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समधून व्यवहारज्ञान, लकी ड्रॉच्या माध्यमातून मनोरंजन आणि सामूहिक आयोजनातून नेतृत्व व संघभावना यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान संपादन न करता संवादकौशल्य, निर्णयक्षमता, आर्थिक व्यवहारांची समज, नियोजन आणि स्वावलंबन यांसारखी जीवनोपयोगी कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. संस्कृतीचा सन्मान, परंपरेचा अभिमान, एकात्मतेचा संदेश आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास यांचा सुंदर मिलाफ साधणारा ‘दांडिया ईव्ह २०२६’ हा सोहळा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी आनंददायी व संस्मरणीय ठरला. दांडियाच्या तालावर थिरकणारी पावले आणि सर्वांच्या चेहऱ्यांवरील आनंद या सोहळ्याच्या यशाची साक्ष देत होते.

 

You may have missed