October 20, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*पारंपरिक वेशभूषा, भोंडल्याची गाणी अन् लोकसंस्कृतीचा जागर! पेरीविंकल स्कूल, पिरंगुटमध्ये भोंडला उत्सव उत्साहात साजरा!!*

पिरंगुट :

पारंपरिक भोंडल्याची गाणी, फेर धरून केलेले सादरीकरण, रंगीबेरंगी वेशभूषा आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे सोमवारी भोंडला उत्सवाची रंगत अनुभवायला मिळाली. चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित या शाळेत महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा जागर घडवणाऱ्या या उत्सवातून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. पारंपरिक लोककलेची ओळख, सांस्कृतिक मूल्यांची जपणूक आणि नव्या पिढीला आपल्या परंपरांशी जोडण्याच्या उद्देशाने आयोजित हा सोहळा आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक अभिमानाने बहरला.

या मंगलमय प्रसंगी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल सर, संस्थापिका सौ. रेखा बांदल , संचालिका कु. शिवानी बांदल , संचालक श्री. यश बांदल, समूहाच्या मुख्य प्राचार्या सौ. निर्मल पंडित आणि पिरंगुट शाखेच्या मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर यांच्यासह शाळेतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात इयत्ता पाचवी, सहावी आणि आठवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या देवीच्या गोंधळ नृत्याने उपस्थितांची मने जिंकली, तर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रावण दहन नाटिकेने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘ऐगिरी नंदिनी’ स्तोत्राच्या प्रभावी सादरीकरणाने संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “आधुनिक शिक्षणाला संस्कारांची जोड आणि प्रगतीला संस्कृतीची साथ लाभली, तरच सुसंस्कृत आणि सक्षम पिढी घडते,” असा प्रेरणादायी संदेश दिला.

पूर्वप्राथमिक विभागापासून इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्सवाची शोभा वाढवली. भोंडल्याची पारंपरिक गीते, फेर धरून केलेले सादरीकरण आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यांमुळे शाळेचा परिसर आनंदाने भारून गेला.

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला भोंडला हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून, एकोपा, सामूहिक आनंद, निसर्गाशी असलेले नाते आणि सांस्कृतिक परंपरांच्या जतनाचे प्रतीक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, सामाजिक जाणीव, सांस्कृतिक मूल्ये आणि भारतीय परंपरांविषयी अभिमान रुजण्यास मदत होते.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पिरंगुट शाखेच्या मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर , पूर्वप्राथमिक विभाग प्रमुख सौ. पल्लवी नारखेडे, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. सना इनामदार आणि माध्यमिक विभाग प्रमुख सौ. रूपाली गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न झाला.

लोकपरंपरेचा जागर, संस्कृतीचा अभिमान आणि आनंदाचा उत्सव! भोंडल्याच्या सुरेल गीतांनी, आकर्षक नृत्याविष्कारांनी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने पेरीविंकल स्कूल, पिरंगुट येथील भोंडला उत्सव संस्मरणीय ठरला.

 

You may have missed