पिरंगुट :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी विद्यार्थ्यांची सुरक्षितता, मुलींचे आरोग्य, स्वच्छता, सायबर सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने ‘सखी सावित्री समिती’ची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मुलींची सुरक्षितता, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्यविषयक जागरूकता, छळवणूक व बालशोषण प्रतिबंध, POCSO कायद्याविषयी जनजागृती, सायबर सुरक्षा, शालेय परिसरातील सुरक्षितता, वाहतूक सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार समुपदेशन व भावनिक आधार देणे, पालकांचा सहभाग वाढविणे आणि आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी योग्य तयारी करणे यावर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राहुल पवळे पंचायत समिती सदस्य तसेच दामिनी पथकाच्या सौ शिरसागर आणि सौ जाधव मॅडम उपस्थित होत्या. यावेळी आशा सेविका सौ. भोज PTA सदस्य सौ. उज्ज्वला पवळे , संयुक्त सचिव सौ. जैतुनबी नदाफ, अंगणवाडी सेविका सौ. नीता धोंडे , पालक प्रतिनिधी सौ. श्रद्धा गोले आणि सौ. रुपाली घंटी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाविषयी आपले विचार मांडले.
*श्री. राहुल पवळे यांनी केले उपक्रमाचे विशेष कौतुक* !
यावेळी पंचायत समिती सदस्य श्री. राहुल पवळे यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, “ *मुळशी तालुक्यात अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत आहे. पेरिविंकल स्कूलने पुढाकार घेऊन राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, मुलींच्या सुरक्षिततेच्या आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने तो खूप महत्त्वाचा आहे. असे कार्यक्रम मुळशी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये आयोजित केले गेले पाहिजेत. हा उपक्रम पुढे नेण्यासाठी माझ्याकडून कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असल्यास मी ती नक्कीच करीन.”*
त्यांनी आपल्या मनोगतातून अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करताना मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळा, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. पेरिविंकल स्कूलने या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात केल्याबद्दल त्यांनी शाळेचे अभिनंदन केले. त्यांच्या या मनोगतामुळे उपस्थितांना अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवले.
या उपक्रमात विद्यार्थिनी कु. आरिणी पवळे आणि कु. दिव्यांशी राठोड यांनीही सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करणे, स्वतःच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी योग्य व्यक्तीकडे मदत मागण्याचे महत्त्व समजावून सांगणे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता.
चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर , संचालिका सौ. रेखा बांदल , संचालिका कु. शिवानी बांदल, संचालक श्री. यश बांदल आणि सर्व शाखाप्रमुख सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेतील पूर्व प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे , प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार , माध्यमिक विभागप्रमुख सौ. रुपाली गर्ग तसेच शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर दिला.
विद्यार्थ्यांना सुरक्षित, आनंदी आणि भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देणे ही शाळा, पालक आणि समाज या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश या बैठकीतून देण्यात आला. विद्यार्थ्यांचे संरक्षण, मुलींचे सक्षमीकरण आणि जागरूक समाजनिर्मिती यासाठी ‘सखी सावित्री समिती’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे मुळशी तालुक्यातील इतर शाळांनाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
*“सुरक्षित विद्यार्थी, सक्षम मुली आणि जागरूक समाज — हीच सखी सावित्री समितीची ओळख* !”


More Stories
पेरीविंकल स्कूल पौड शाखेत शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा
खडकवासला धरणातील दूषित पाण्याचा मुद्दा महापालिकेत गाजला; महापौर-आयुक्तांना वॉटर प्युरिफायर भेट
*“पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाशी नाते!” — डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पेरिविंकल स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा*