पुणे महानगरपालिका :
खडकवासला धरणात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित सांडपाणी मिसळत असल्याचा गंभीर मुद्दा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत उपस्थित करण्यात आला. पुणेकरांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य अमोल बालवडकर यांनी इतर सहकारी नगरसेवकांसोबत विरोधी पक्षनेते निलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली महापौर आणि महापालिका आयुक्तांना ‘वॉटर प्युरिफायर’ भेट दिला. तसेच, दूषित पाण्याच्या समस्येवर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली.
पुणेकरांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. मात्र, खडकवासला धरणात दूषित सांडपाणी मिसळत असल्याचा मुद्दा गंभीर असून, यामुळे पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत चिंता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या समस्येकडे गांभीर्याने पाहून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे अमोल बालवडकर यांनी यावेळी अधोरेखित केले.
खडकवासला धरणात मिसळणाऱ्या दूषित सांडपाण्याचा स्रोत तातडीने शोधून तो बंद करावा, पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याची खात्री द्यावी, तसेच दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या. याशिवाय, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
प्रशासनाने आश्वासनांपलीकडे जाऊन कृती करावी
पुणेकरांना आश्वासनांपेक्षा शुद्ध पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी. दूषित पाण्याच्या समस्येचे मूळ शोधून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. शुद्ध पाणी हा पुणेकरांचा हक्क असून, त्यासाठी आवाज उठवणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य असल्याची भूमिका अमोल बालवडकर यांनी मांडली.


More Stories
पेरीविंकल स्कूल पौड शाखेत शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा
*“पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाशी नाते!” — डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पेरिविंकल स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा*
*पेरीविंकलच्या बावधन व सुस शाखेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा!!*