October 14, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे संरक्षण करा,खडकवासला धरण परिसरात सांडपाणी रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज : नगरसेवक अमोल बालवडकर

खडकवासला :

“हवा प्रदूषित आता पाणीही दूषित… पुणेकरांनी श्वास घ्यायचा कसा, प्यायचं काय आणि जगायचं तरी कसं?” असा सवाल करत पुणे महानगर पालिकेच्या प्रशासनानं पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे होणारे दुषीकरण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केले आहे.

पुणेकरांनो, खडकवासला धरणातील पाणी हे दूषित झालं आहे व त्याचा थेट परिणाम पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्यावर होत असून आरोग्यावरही झालेला आहे. त्यामुळे धरणात सांडपाणी मिसळण्याचा प्रश्न केवळ धरण परिसरापुरता मर्यादित नसून, तो लाखो पुणेकरांच्या आरोग्याशी निगडित आहे.

खडकवासला परिसरातील गोरे बुद्रुक, गोरे खुर्द, सिंहगड पायथा, खानापूर, मांडवी, कुडजे आदी गावांमधील काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक आस्थापनांमधून दूषित पाणी धरणाच्या जलस्रोतांमध्ये सोडले जात असल्याच्या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करणे काळाची गरज असून खडकवासला धरण परिसरात नियमित गस्त घालून सांडपाणी कुठून आणि कशा प्रकारे सोडले जाते, याची तपासणी करावी.

तसेच प्रक्रिया न केलेले सांडपाणी जलस्रोतांमध्ये सोडणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. नियमानुसार आवश्यक असलेल्या व्यावसायिक आस्थापनांना सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) उभारणे बंधनकारक करावे. प्रक्रिया केलेले पाणीच निर्धारित निकषांनुसार सोडले जाईल, याची खात्री करावी.

विशेष म्हणजे याबाबतीत वरील गावांतील सर्वसामान्य ग्रामस्थांना दोष देणे योग्य नाही. गावांमधील सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारीही महत्त्वाची आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका किंवा राज्य शासनाने संबंधित ग्रामपंचायतींना STP उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. कारण या परिसरातील जलस्रोतांचे संरक्षण म्हणजे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे संरक्षण आहे.

पुणेकर नियमित कर भरतात, तो स्वच्छ आणि सुरक्षित नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून; दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात यावे म्हणून नाही. त्याचबरोबर खडकवासला परिसरातील ग्रामस्थांनाही योग्य सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधा मिळणे आवश्यक आहे.

म्हणूनच पुणे महानगरपालिका प्रशासनाने या विषयाकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता, सार्वजनिक आरोग्य आणि जलस्रोतांच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न म्हणून पाहावे. खडकवासला धरणाचे पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस कृती करा. पुणेकरांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळालेच पाहिजे!

ड्रोन वीडियो द्वारे आपण पाहू शकतो की प्रदूषित पाणी कसे खडकवासला धरणामध्ये जात आहे! अशा प्रकारचे ५ ठिकाणावरून १२ महिने २४ तास दूषित पाणी वाहत आहे.