October 24, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी स्टेडियमसमोरील कचरा डेपो अखेर बंद!मोरेश्वर बालवडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश..

बालेवाडी :

बालेवाडी स्टेडियमसमोरील महामार्गालगत असलेल्या कचरा डेपोमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्गंधीचा त्रास सहन करणाऱ्या बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मोरेश्वर बालवडकर यांनी पुणे महानगरपालिका आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, संबंधित कचरा डेपो बंद करण्यात आला आहे.

बालेवाडी स्टेडियमसमोरील महामार्गालगत असलेल्या या कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिकांसह आसपासच्या सोसायट्यांमधील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे हा कचरा डेपो हटविण्याची अथवा बंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती.

या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन मोरेश्वर बालवडकर यांनी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून पुणे महानगरपालिका आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासनाशी वेळोवेळी संपर्क साधून नागरिकांच्या अडचणी मांडल्या. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. अखेर त्यांच्या पाठपुराव्यानंतर हा कचरा डेपो बंद करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

या कामासाठी कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाशी समन्वय साधून प्रयत्न करण्यात आल्याचे बालवडकर यांनी सांगितले.

नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडविणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. पद असो वा नसो, जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने उभे राहून त्यांचा पाठपुरावा करणे हीच खरी जनसेवा आहे. राजकारणापेक्षा जनहित, आश्वासनांपेक्षा कृती आणि प्रसिद्धीपेक्षा नागरिकांना मिळणारा दिलासा महत्त्वाचा असल्याची भूमिका मोरेश्वर बालवडकर यांनी व्यक्त केली.

बालेवाडी स्टेडियमसमोरील कचरा डेपो बंद झाल्याने परिसरातील स्वच्छतेला चालना मिळण्यास मदत होणार असून, नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.