October 23, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बनावट स्टॅम्प आणि खोट्या नोटरीद्वारे बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न; फसवणूक प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

पुणे :

बाणेर येथील मोक्याच्या ठिकाणी असलेली जमीन बळकावण्याच्या उद्देशाने बनावट स्टॅम्प पेपर, खोटे कुलमुखत्यारपत्र (Power of Attorney) व नोटरीचे बनावट दस्तऐवज तयार करून ५६ वर्षीय महिला व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहल संजय पिंपरकर (वय ५६, रा. साकेत सोसायटी, डी. पी. रोड, औंध, पुणे) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

पोलीस माहितीनुसार, तक्रारदार स्नेहल पिंपरकर व त्यांच्या पतींनी बाणेर येथील स. नं. १२२/१/२/२ व १२१/१३/२ या जमिनी आरोपींकडून २००२-२००६ मध्ये रीतसर नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्र व विकसन करारनामा पूर्ण मोबदला देऊन करण्यात आला होता. या आधारे खरेदीखत(Sale Deed) करण्यात आली. या कागदपत्रांच्या आधारे त्यांचा जमिनीवर ताबा व मालकी हक्क प्रस्थापित झाला आहे.

मात्र, आरोपींनी सदर जमीन हडप करण्याच्या कुहेतूने १४ सप्टेंबर २००१ रोजीच्या मागील तारखेचे (Back-dated) बनावट करारनामा व कुलमुखत्यारपत्र तयार केले. या बनावट दस्तांसाठी १०० रुपयांचे दोन मोकळे स्टॅम्प पेपर वापरून ते मुद्रांक विक्रेता कल्पना कदम यांच्याकडून घेतल्याचे भासवण्यात आले. तसेच, नोटरी सतीश कुमार तिवारी यांच्या नावाने हे दस्तऐवज नोटरी रजिस्टर केल्याचे दाखवले गेले आणि साक्षीदारांची पूर्वकल्पना न घेता त्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या.

माहिती अधिकारात (RTI) भांडाफोड

तक्रारदारांच्या सहकाऱ्याने माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) माहिती मागवली असता, धक्कादायक बाबी उघडकीस आल्या:

१. रद्द झालेली नोटरी: विधी व न्याय विभाग, मंत्रालय (मुंबई) यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, संबंधित नोटरी सतीश कुमार तिवारी यांचे नाव १२ एप्रिल १९९६ रोजीच शासकीय राजपत्रातून (Gazette) नोटरी रजिस्टरमधून हटवण्यात आले होते.

२. बनावट स्टॅम्प पेपर: दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुद्रांक विक्रेता कल्पना कदम यांनी आरोपींना असे कोणतेही स्टॅम्प पेपर विकले नव्हते आणि त्यावरील शिक्का व स्वाक्षरीही बनावट असल्याचे नमूद केले.

३. साक्षीदारांची फसवणूक: दस्तऐवजावरील साक्षीदारांनीही आपल्याला या प्रकाराची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.

४. दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदवहीतील नोंदीनुसार, सदर स्टॅम्पची दर्शनी किंमत रुपये १०० नसून रुपये २० इतकी आहे. तसेच, सदर स्टॅम्पची विक्री बजाज ऑटो एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांना विक्री केल्याची नोंद संबंधित नोंदवहीमध्ये असल्याचे दिसून येते.”

या आरोपींवर गुन्हा दाखल:

याप्रकरणी पोलिसांनी खालील ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे:

१. रामदास हनुमंत सायकर (वय ५७, रा. करंदी, ता. शिरूर, जि. पुणे)

२. शकुंतला हनुमंत सायकर (वय ७६, रा. करंदी, ता. शिरूर, जि. पुणे)

३. रंजना हनुमंत सायकर (वय ७४, रा. करंदी, ता. शिरूर, जि. पुणे)

४. छाया सुनील रासकर (वय ५६, रा. करंदी, ता. शिरूर, जि. पुणे)

५. योगेश पोपटराव कळमकर (रा. बाणेर, पुणे)

६. जीवन पोपटराव कळमकर (रा. बाणेर, पुणे)

पोलीस कारवाई:

बाणेर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(३), ३१८(४), ३३६, ३३६(२), ३३६(३), ३३८, ३३९, ३४०(२), ६१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

You may have missed