May 6, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

मुळा नदी किनारा आणि सोंडमळा देवराई वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा आणि पर्यावरणप्रेमींचा एकत्रित लढा; वनविभाग आणि महापालिकेचा सकारात्मक प्रतिसाद..

बाणेर :

बाणेर भागातील मुळा राम नदीच्या किनारी असलेली सोंडमळा देवराई आणि तेथील समृद्ध जैवविविधता नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, मूळ शेतकरी आणि विविध पर्यावरणप्रेमी संस्था एकत्र आले असून, त्यांनी या नैसर्गिक संपदेला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वनविभाग आणि पुणे महानगरपालिकेने देखील या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे.

स्थानिक निसर्गप्रेमी सुधाकरभाऊ धनकुडे यांच्यासह वंदना चौधरी, शैलजाताई, सारंग वाबळे, अमेय जगताप, मेघना भंडारी, बालेवाडी मधून मोरेश्वर बालवडकर आणि आशिष कोटमकर यांसारख्या अनेक निसर्गप्रेमी कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाला थेट विरोध न करता, येथील निसर्ग संपदा कशी सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सोंडमळा परिसरात प्राचीन वृक्ष, दुर्मिळ पशुपक्षी आणि ऐतिहासिक मंदिरे व बांधकामे आहेत. या महत्त्वपूर्ण नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसाचे जतन व्हावे यासाठी या भागाला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी संबंधित मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. या मागणीच्या अनुषंगाने, मंत्रालयाने वनविभागाला तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश वनविभागाला देण्यात आले आहेत.

 

प्राथमिक माहितीनुसार, वनविभाग आणि पुणे महानगरपालिका या संदर्भात सकारात्मक अहवाल पाठवण्याच्या तयारीत आहेत. यामुळे सोंडमळा देवराई आणि मुळा नदी किनारील जैवविविधता वाचवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे.