April 26, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुसगाव येथे रंगणार कुस्तीचा थरार श्री काळभैरवनाथ उत्सव २०२५ निमित्त भव्य राज्यस्तरीय कुस्त्यांची जंगी आखाडा..

सुसगाव :

सुसगाव येथे सालाबाद प्रमाणे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सव दिनांक १९ व २० एप्रिल २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. १९ एप्रिल रोजी यात्रेनिमित्त श्रींचा अभिषेक व महापूजा तसेच सायंकाळी श्री कालभैरवनाथ पालखीची मिरवणूक होणार असून रात्री महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलाकार रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. रविवार २० एप्रिल रोजी ‘श्री काळभैरवनाथ मानाची गदा’ भव्य राज्यस्तरीय कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार आहे.

 

राज्यस्तरीय कुस्त्यांच्या जंगी आखाड्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. या आखाड्यात विविध गटांमध्ये कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने भव्य स्पर्धा आणि खुला गट तसेच मुळशी तालुकास्तरीय गट कुस्ती स्पर्धा यांचा समावेश असेल. या स्पर्धेत विविध वजनी गटांमध्ये कुस्त्या होतील. प्रत्येक गटातील विजेत्यांना आकर्षक रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. खुल्या गटातील प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या पैलवानाला ‘श्री काळभैरवनाथ मानाची गदा’ देऊन गौरवण्यात येणार आहे.

समस्त ग्रामस्थ मंडळी-सुसगाव, हनुमान तालीम संघ व श्री काळभैरवनाथ उत्सव कमिटी-सुसगाव यांच्या वतीने ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सव आणि भव्य राज्यस्तरीय कुस्ती आखाडा पाहण्यासाठी परिसरातील आप्तेष्ट पाहुणे मित्र परिवार सह कुस्ती शौकीनांना सहभागी होण्याचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.