August 9, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथे लहु बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने निःशुल्क योगोपचार शिबिराचे आयोजन..

बालेवाडी :

लहु गजानन बालवडकर सोशल वेलफेअर- पुणे आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, बालेवाडी- पुणे येथे तीन दिवसीय “योगोपचार” शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १२, १३ आणि १४ एप्रिल रोजी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत आयोजित केले जाईल आणि ते पूर्णपणे निःशुल्क असेल.

 

या शिबिरामध्ये प्रामुख्याने पाठीच्या मणक्यांचे त्रास तसेच दैनंदिन जीवनातील तणावामुळे होणारे उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांवर योगिक पद्धतीने उपचार कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. नियमित योगाभ्यासाने या आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे योगतज्ज्ञांचे मत आहे.

जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर हे गेल्या ७५ वर्षांपासून निःशुल्क योग प्रचार व प्रसार तसेच योगोपचाराच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य सुधारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. मंडळाचे योगगुरु आणि योगोपचार तज्ञ श्री राम खांडवे गुरुजी या शिबिरात प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी गेली ४० वर्षे योगोपचाराच्या माध्यमातून अनेक गरजूंना आरोग्यप्राप्तीचा मार्ग दाखवला आहे. या शिबिराला डॉ. अनिरुद्ध गुर्जलवार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

हे शिबिर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला भविष्यात होणाऱ्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी निश्चितच मदत करेल, तसेच तुम्हाला असलेल्या दुखण्यांवर मात करण्यासाठी एक प्रभावी उपाय ठरेल. या महत्त्वपूर्ण आणि पूर्णपणे निःशुल्क शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हा !
लहू बालवडकर (चिटणीस :भाजपा पुणे शहर)

लहू बालवडकर सोशल वेल्फेअर नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असते आणि हे योगोपचार शिबिर त्यांच्या याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

या निःशुल्क शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी बातमीत दिलेल्या QR कोड स्कॅन करून नोंदणी करावी. शिबिराला येताना प्रत्येकाने स्वतःची मॅट किंवा चादर सोबत आणावी तसेच आरामदायक असे ट्रॅक सूट किंवा सुटे कपडे परिधान करावे, असे आयोजकांनी कळवले आहे.