May 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीत ‘एसकेपी किड्स प्रीमिअर लीग’चा दणक्यात समारोप; चिमुकल्या क्रिकेटपटूंनी घातला धावांचा पाऊस!

बालेवाडी :

श्री खंडेराय प्रतिष्ठान आणि बालेवाडी विमेन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एसकेपी किड्स प्रीमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना बालेवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या ११ आणि १४ वर्षांखालील मुलांच्या या क्रिकेट लीगने परिसरातील क्रीडाप्रेमींना अक्षरशः खिळवून ठेवले होते. अंतिम सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत चिमुकल्या खेळाडूंनी धावांचा पाऊस पाडला आणि उपस्थितांना उत्कंठेच्या शिखरावर पोहोचवले.

 

११ वर्षांखालील गटात ४३ प्रायव्हेट ड्राइव्ह संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर एलाईट एम्पायर संघाने द्वितीय आणि पार्क एक्सप्रेस संघाने तृतीय स्थान मिळवले. १४ वर्षांखालील गटात देखील ४३ प्रायव्हेट ड्राइव्ह संघाने आपले वर्चस्व राखत प्रथम क्रमांक मिळवला. कमफर्ट झोन संघाने द्वितीय आणि ओरवी संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेतील लहान खेळाडूंनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मागील एक महिन्यात आम्हाला क्रिकेटचा खूप आनंद आला.”

बालेवाडी विमेन्स क्लबच्या संस्थापिका अध्यक्षा प्रा. रूपालीताई बालवडकर यांनी सांगितले की, “आजच्या विज्ञान युगात लहान मुले मोबाईल आणि इतर उपकरणांमध्ये रमून आपले बालपण विसरत आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांनी मैदानी खेळांचा आनंद घ्यावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने मुले आणि त्यांचे पालक एकत्र आले आणि त्यांनी खेळाचा आनंद लुटला, हे पाहून आमचा उद्देश सफल झाला आहे.”

संस्थेचे सचिव डॉ. सागर बालवडकर यांनी बालेवाडी परिसरातील नागरिकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आणि पुढील वर्षी आणखी नवीन वयोगटातील मुलांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली.

बालेवाडी बाणेर परिसरात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या बालेवाडी विमेन्स क्लब आणि श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे अनेक नागरिकांनी आभार मानले.

या समारंभाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री आप्पासाहेब बालवडकर यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सर्व सदस्य, पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने बक्षीस समारंभासाठी उपस्थित होते.

विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ‘एसकेपी किड्स प्रीमिअर लीग’ने बालेवाडी परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले होते, याची प्रचिती उपस्थितांच्या चेहऱ्यावरून येत होती.