April 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

भोर, राजगड, मुळशीच्या विकासाला गती: आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रयत्नांना यश, नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रश्न मार्गी लावला

पुणे :

पुणे – सातारा राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील पुणे शहराच्या नागरी भागातील सेवा रस्त्यांच्या (सर्व्हिस रोड) सुधारणा आणि पुनर्वसनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ७८५.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भोर, राजगड, मुळशी मतदारसंघातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

 

या कामासाठी भोर, राजगड, मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, गडकरी यांनी या कामासाठी निधी मंजूर केला आहे. पुणे शहराच्या विकासामध्ये या महामार्गाचे महत्त्व लक्षात घेऊन मांडेकर यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे या रस्त्याच्या सुधारणेसाठी पाठपुरावा केला होता.

या प्रकल्पांतर्गत सेवा रस्त्यांचे (सर्व्हिस रोड) रुंदीकरण तसेच सध्या असलेल्या फुटपाथ सेवा रस्त्याचे मजबूत फुटपाथमध्ये सुधारणा करण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील राष्ट्रीय महामार्ग ४८ च्या परिसरातील गर्दी कमी होण्यास मदत होईल.

या निधीच्या मंजुरीमुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) आणि पुणे महानगरपालिका (पीएमसी) हद्दीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या भागातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

आमदार शंकर मांडेकर यांनी या निर्णयाबद्दल नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. तसेच, या निधीच्या माध्यमातून या भागातील विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते विशाल विधाते यांच्या सोबत नितीन गडकरी यांची भेट घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले होते.

You may have missed