March 14, 2025

Samrajya Ladha

पाषाण-सुस लिंक रोडच्या कामात कोट्यवधी रुपयांचा अपव्यय, पुणे महानगरपालिका प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार, जयेश मुरकुटे यांचे प्रशासनाला खरमरीत पत्र…

बाणेर :

पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. पाषाण-सुस लिंक रोडच्या कामात कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी केला आहे.

 

याबाबत बोलताना जयेश मुरकुटे म्हणाले, “गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले पाषाण-सुस लिंक रोडचे काम सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र, आता पुन्हा या रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी हा रस्ता खोदण्यात येत आहे. यामुळे जनतेच्या करातून जमा होणारा पैसा वाया जात आहे.”

“रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ड्रेनेज लाईनचे काम हाती घेतल्याने प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार उघड झाला आहे. या कामासाठी योग्य प्राधान्यक्रम ठरवला गेला नाही,” असेही त्यांनी सांगितले.

आता झालेल्या गोष्टीला काही करता येत नाही, हे मी जाणतो. पण किमान इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक कामांमध्ये योग्य प्राधान्यक्रम ठरवून, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता जनतेचा पैसा असा वाया जाणार नाही, याची काळजी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांची आहे, हे लक्षात घेऊन यापुढे असे होणार नाही, अशी काळजी घ्यावी, ही कळकळीची विनंती जयेश मुरकुटे यांनी केली आहे.