नवी दिल्ली :
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेचं उद्घाटन नवी दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडप येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शिक्षेचं महत्त्व पटवून देताना भविष्यातील शैक्षणिक बदलांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दहावी आणि बारावी ऐवजी नवीन शिक्षण प्रणाली राबवण्यात येणार असून CBSE अभ्यासक्रमात बदल होणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. भारताला संशोधन आणि नवीन कल्पनांचे केंद्र बनवण्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पारंपारिक ज्ञान प्रणालीपासून भविष्यातील तंत्रज्ञानाला संतुलित पद्धतीने महत्त्व देण्यात आले आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. यावेळी ते पुढे म्हणाले की, ‘देशातील शिक्षणतज्ज्ञांनी संशोधन परिसंस्था मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना नवीन व्यवस्थेची चांगली माहिती आहे. 10+2 शिक्षण पद्धतीच्या जागी 5+3+3+4 शिक्षण पद्धत सुरू केली जात आहे. शिक्षणाची सुरुवात वयाच्या तिसऱ्या वर्षापासून होईल. यामुळे देशात एकरुपता येईल.’
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, येत्या काळात देशातील सर्व सीबीएसई शाळांमध्ये एकच अभ्यासक्रम लागू केला जाईल. यासाठी 22 भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत. दरम्यान यावेळी पीएमएसश्री योजनेचा पहिला हप्ताही जारी करण्यात आला.
”शिक्षणातच देशाचे नशीब बदलण्याची ताकद आहे. देश ज्या ध्येयाने पुढे जात आहे, त्यात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे. तुम्ही (विद्यार्थी) त्याचे प्रतिनिधी आहात. अखिल भारतीय शिक्षा समागमाचा भाग बनणे ही माझ्यासाठी एक महत्त्वाची संधी आहे.” – पंतप्रधान नरेंद्र मोदी
More Stories
रेल्वे मंत्रालयाच्या सात प्रकल्पांना मोदी सरकारची मंजुरी…
डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर..
गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल मेटाला दररोज 1 दशलक्ष इतका दंड आकारला जाणार..