February 19, 2025

Samrajya Ladha

बाणेर येथे सौ. पूनम विधाते आयोजित ‘उडान नारीशक्ती रन’ मध्ये उद्या हजारो महिला धावणार….

पुणे :

उद्या रविवारी, ५ जानेवारी २०२५ रोजी बाणेर येथे ‘उडान नारीशक्ती रन’ हा महिलांसाठी खास उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ताम्हाणे चौक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथून सकाळी सहा वाजता या रनची सुरुवात होणार असून, या उपक्रमात सुमारे ११ हजार महिलांनी नोंदणी केली आहे. महिलांच्या आरोग्य आणि सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पूनम विशाल विधाते यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आयोजित केला जात असून यंदा त्याचे दुसरे वर्ष आहे.

 

“महिलांना आरोग्याची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या सवयी सुधारण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नववर्षाची सुरुवात आपण आरोग्यदायी करू या, असे म्हणत हजारो महिलांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला आहे,”
सौ.पूनम विशाल विधाते
अध्यक्ष : वामा वुमन क्लब/
कार्याध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर

धावण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन खासदार सुनेत्रा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे आणि उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होईल.

यावेळी अभिनेत्री श्रुती मराठे, आमदार शंकर मांडेकर, सिद्धार्थ शिरोळे, रूपाली चाकणकर, दीपक मानकर, प्रदीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा उपक्रम महिलांना सशक्त बनवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.