January 22, 2025

Samrajya Ladha

बालेवाडी वेलफेअर फेडरेशनने राबविले मतदार जनजागृती अभियान

बालेवाडी :

बालेवाडी वेलफेअर फेडरेशन अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असते. करोना काळात मोठ्या प्रमाणावर लसीकरण असो किंवा कष्ट करणाऱ्या लोकांसाठी अपघाती विमा असो किंवा रक्तदान शिबिराचे आयोजन असो फेडरेशन आपले सामाजिक दायित्व नेहमी पार पाडीत असते. मागील निवडणुकीच्या काळात बालेवाडी वेलफेअर फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना हे जाणवले की आपला परिसर एक सुशिक्षित नागरिकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. परंतु मतदानाबाबत येथे उदासीनता दिसून येते. मागील निवडणुकीत फारच कमी नागरिकांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदविला.

 

गृहरचना सोसायटीतील नागरिक मतदानाची सुट्टी कोठेतरी सहल काढून साजरी करतात. घरी असले तरी मतदान करण्यासाठी जात नाहीत. याची महाराष्ट्र निवडणूक आयोगाने देखील दखल घेऊन सर्व गृहरचना सोसायटी आणि सोसायटयांचे फेडरेशन यांना निर्देश दिले आहेत त्यांनी याबतीत मतदार जनजागृती अभियान चालवावे. लोकशाहीत मतदान करणे, एक पवित्र कर्तव्य आहे आणि ते सर्वांनी पार पाडले पाहिजे, या उद्देशाने बालेवाडी वेलफेअर फेडरेशनने व्यापक जनजागृती अभियान सुरू केले आहे.

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी बनविल्या गेलेल्या पोस्टर्स आणि बॅनर्सचे उद्घाटन कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आले. हे पोस्टर्स व बॅनर्स सर्व सोसायटीत लावले जात असून त्यावरील संदेश लोकजागृतीचे प्रभावीपणे काम करेल असे वाटते. फेडरेशनचे कार्यकर्ते प्रत्येक सोसायटीत जाऊन नागरिकांचे प्रबोधन करीत आहेत. याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

बालेवाडी वेलफेअर फेडरेशनतर्फे एक बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. ज्या सोसायटीचे ७५ टक्के पेक्षा जास्त मतदान होईल त्यांना फेडरेशन तर्फे बक्षीस दिले जाईल. त्या सोसायटीच्या चेअरमन व सेक्रेटरी यांचा सन्मान केला जाईल.

You may have missed