November 21, 2024

Samrajya Ladha

देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे कोथरुडमध्ये भाजपाला बळ, अमोल बालवडकर यांचा चंद्रकात दादांना पाठिंबा…

बाणेर :

कोथरूड विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहण्याची घोषणा केल्यानंतर आज परत एकदा ट्विस्ट आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थी नंतर अमोल बालवडकर यांनी विधानसभा निवडणुकीमधून माघार घेत नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा दर्शविला.

याबद्दल माहिती देताना अमोल बालवडकर यांनी सांगितले की, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या तत्त्वावर भारतीय जनता पक्ष निष्ठेने जनतेची सेवा करत आला आहे. मी या पक्षाचा एक भाग असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणे हा उद्देश नेहमीच राहिला आहे आणि तो एक लोकप्रतिनिधी या नात्याने पूर्ण देखील केला आहे.

परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढवणार अशी इच्छा व्यक्त केली होती. सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मला उमेदवारी मिळावी यासाठी मी आग्रही होतो. परंतु भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांना संधी मिळाली, काही गोष्टींवरून आमचे मतभेद होते, मात्र आज ते मतभेद माझे नेते आणि राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून दूर झाले आहेत. त्यामुळे आज कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी मी मागे घेत असून मा. चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा देत आहे.

आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा कोथरूड मध्ये भाजपाचा झेंडा फडकावण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि चंद्रकांतदादांच्या प्रचारार्थ मेहनत घेईल. विशेष म्हणजे या विधानसभेच्या सर्व प्रक्रियेत माझ्या सोबत असणारी जनता आणि कार्यकर्ते यांना विचारूनच मी हा निर्णय घेतला आहे. शेवटी जनतेच्या शब्दाबाहेर मी कधीच जाणार नाही आणि येणाऱ्या काळात जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटत राहील असे अमोल बालवडकर यांनी सांगितले.