September 12, 2024

Samrajya Ladha

शिक्षक घेण्यापेक्षा देण्यात जास्त धन्यता मानतो – संचालिका शिवानी बांदल पेरीविंकल मध्ये ‘शाही’ शिक्षक दिन साजरा..

पौड :

शालेय जीवनात अत्यंत उत्साहात साजरा केला जाणारा एक सण आहे. आपण प्रत्येक वर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतो. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. तसेच शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.

 

शिक्षकामुळे विद्यार्थ्याला फक्त परीक्षांमधून चांगले गुण प्राप्त होत नाहीत तर त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळते. त्याला त्याच्या आजूबाजूच्या जगाबद्दल, दुनियेबद्दल जाण येते. हे सगळ्या गोष्टींमुळे एका शिक्षकाचे त्याच्या विद्यार्थ्याच्या जीवनातील, त्याच्या यशाच्या वाटचालीतील योगदान हे फार महत्त्वाचे ठरते.

पेरीविंकल मध्ये आजचा हा शिक्षक दिन अनोख्या उत्साहात साजरा झाला. रांगोळी, फलक लेखन , परिसर सजावट, कार्यक्रमासाठी मंच सजावट, आजचे उत्सव मूर्ती म्हणजेच आपला सर्व शिक्षक वर्गाची बैठक व्यवस्था, त्यांचा अल्पोपहार या आणि अशा सर्व तयारीत इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मदत केली.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सभापती मा. श्री. भानुदास पानसरे, पेरीविंकल समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, रेखा बांदल, शिवानी बांदल आणि शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अभिजित टकले यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन आणि सरस्वती पूजन आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् याच्या प्रतिमेचे पूजन झाले.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापक डॉ. अभिजित टकले सरांनी शिक्षकाच्या वाढत्या जबाबदा -या अधोरेखित केल्या. शिवानी बांदल यांनी शिक्षकांचे विद्यार्थी आणि माणूस घडविण्यातील योगदान कसे महत्त्वपूर्ण आहे ते सांगितले.

संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदलसरांनी जपान मधील होकयु च्या कथेतून शिक्षकाची भूमिका उपस्थितांसमोर मांडली. शिक्षक ओबामा घडवू शकतो तसेच ओसामाही घडवू शकतो, आणि म्हणून शिक्षकांनी जबाबदारीने वागावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल यांनी ग्रामीण भागात शिक्षणासाठी तळमळीने केलेले कार्य आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. भानुदास पानसरे यांनी आपल्या आठवणींना उजाळा देऊन सांगितले. आजच्या बदलत्या काळातही शिक्षकाचा आपल्या आयुष्यावरचा अमिट ठसा कसा महत्वाचा आहे ते त्यांनी विशद केले.

सर्व शिक्षकांचाही उचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त संस्थे कडून मिळालेली भेट शिक्षकांच्या सदैव स्मरणात राहील.

आजच्या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका शिवानी बांदल, मुख्याध्यापक डॉ. अभिजित टकले, पर्यवेक्षिका पूनम पांढरे, सना इनामदार, पल्लवी नारखेडे, प्राजक्ता वाघवले, तसेच पिरंगुट, पौड, माले आणि कोळवण येतील सर्व शिक्षक वृंद यांनी मोलाची मदत केली.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.