September 12, 2024

Samrajya Ladha

पाषाण येथील कोकाटे तालिममंडळचावतीने गणेशमुर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित.

पाषाण :

पाषाण,येथील लोकसेवा स्कूलमध्ये कोकाटे तालिम मंडळ व लोकसेवा स्कुल यांचा वतीने इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या कलात्मक गुणांना वाव देण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाची जाणीव जागृती करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष,मा.आमदार दिपक पायगुडे,पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष श्री.राहुल कोकाटे यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 

या वेळी विद्यार्थ्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या गजरात बाप्पाची मूर्ती साकारायला मोठ्या उत्साहात सुरुवात केली. शाडूच्या मातीचा वापर करून गणेशमूर्ती बनवण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांना पर्यावरणाला हानी न पोचवता व पाण्याचे प्रदूषण कमी करत सण साजरे करता यावेत याची अधिक जाणीव व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून याअंतर्गत लोकसेवा स्कूलमधील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या सभागृहात ‘इको फ्रेंडली’ गणपती बाप्पा बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात जवळपास १२०० विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता.
स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती साकारत असल्याचा आनंद आणि लगबग विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होती.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ.मयुरी कोकाटे, विद्याधर देशपांडे,किशोर मोरे, रत्नाकर मानकर, गिरिधर राठी, उत्तम जाधव, संस्थचे संचालक नरहरी पाटील, मुख्याध्यापक शॉपीमॉन सर, संस्थेचे मार्गदर्शक जनक टेकाळे, मनोहर पाटील, विभागप्रमुख पूर्वी शुक्ला, दिपाली गजभिये, जानकी पी. अंकिता वशिष्ठ आदी उपस्थित होते. यावेळी कोकाटे यांनी बोलताना, पर्यावरणाशी नाते जोडू या, शाडूची मूर्ती बनवू या आणि गणपती बाप्पांचे स्वागत करू या, असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

मूर्तीला सोंड, हात, विविध अवयव कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक पाषाण येथील अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य भारती सर, पुंडे सर यांच्यासह प्रथम वर्ष, द्वितीय वर्षाच्या फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार शाडूच्या मातीचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी सुंदर मूर्ती साकारल्या.

गणपती हे मुलांचे लाडके दैवत असल्याने गणेशमूर्ती कशी असावी, बाप्पासाठी देखावा कसा असावा या कल्पनेत ते हरवून गेलेले असतात. मुलांचा तोच आनंद द्विगुणित व्हावा, यासाठी घराघरात दहा दिवसांच्या काळात मुलांनी स्वतः बनविलेली लाडक्या बाप्पाची मूर्ती मखरात बसवून तिचीच मनोभावे पूजा केली तर तो आनंद काही औरच असेल. या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले होते.
– राहुल कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते

अभिनव कला महाविद्यालयाच्या ताई दादांनी आम्हाला शाडूच्या मातीचा उपयोग करत माती कशी भिजवायची, मूर्ती कशी बनवायची याचे सखोल मार्गदर्शन केले. त्यानुसार आम्ही हसत खेळत गणपतीच्या मूर्ती बनविल्या. या कार्यशाळेत आम्हाला खूप मज्जा आली.
– साई लामखडे, विद्यार्थी