September 8, 2024

Samrajya Ladha

बावधन, पौड, माले, कोळवणच्या पेरिविंकल मधील आरोग्यदिंडीत विठू नामाचा गजर: मुळशी तालुक्यात आरोग्य दिंडी ठरली लक्षवेधी

बावधन :

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल बावधन,पौड, माले, कोळवन येथे पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे प्रतिमापूजन व आरतीने करण्यात आली. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले,रिंगण सोहळा,पालखी सोहळा व विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात हा सोहळा पार पडला. विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व इतर संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्याचे आकर्षण ठरले.

 

या पालखी सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पालखींचे आयोजन केले होते यामध्ये ग्रंथदिंडी,आरोग्य दिंडी,शैक्षणिक दिंडी, वृक्षदिंडी अशा दिंड्या काढून त्याविषयी जनजागृती करण्यात आली. यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. इतर दिवशी शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी या दिवशी पांढरा झब्बा, टोपी,कपाळी बुक्का, गळ्यात टाळ व नऊवारीत मुली डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठू नामाचा गजर करत तहानभूक हरपत विठ्ठलाच्या भक्तीत दंग झाले. यानिमित्ताने भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

आषाढी एकादशीनिमित्त आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, देहू येथून तुकारामांची, पैठणी येथून एकनाथांची, त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथांची आधी संतांच्या पालख्या वारकऱ्यांसोबत पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात. वारीचा हा सुख सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या पवित्र संस्कृतीचा अप्रतिम नजारा असतो म्हणूनच पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांना वारीची अनुभूती करून दिली जाते.

चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संचालक श्री राजेंद्र बांदल सर व संचालिका रेखा बांदल यांनीही वारीत सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांचे कौतुक केले. यावेळी उद्योजक शैलेश शेट्टी व बाळासाहेब ढोकळे सर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रिया लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका इंदू पाटील, कल्याणी शेळके, प्राजक्ता वाघवले व शिक्षक वृंद यांनी पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली गायकवाड यांनी केले.