September 8, 2024

Samrajya Ladha

म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडानगरीत कबड्डीदिन साजरा,७१ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा व पुणे लीग स्पर्धेचे उद्घाटन संपन्न..

म्हाळुंगे-बालेवाडी :

आपल्या मातीतील रांगडी कबड्डी गावागावात, गल्लीबोळात रुजवून कबड्डीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या “कबड्डी महर्षी” वंदनीय बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त १५ जुलै रोजी कबड्डीदिन साजरा केला जातो.याच कबड्डी दिनाचे औचित्य साधून आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज ७१ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा -२०२४ या स्पर्धेचा आणि पुणे लीग कबड्डी स्पर्धेचा आज राज्यसभा खासदार सौ.सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते व आ.अतुल बेनके (अध्यक्ष-पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

 

कबड्डी खेळाला एका उंचीवर नेण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी राज्यातील सन्माननीय ज्येष्ठ कबड्डी खेळाडूंचा आज कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. कब्बडी हा केवळ खेळ नसून मातीला जोडणारी नाळ आहे, त्यामूळे नव्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी या जेष्ठ खेळाडूंनी आजच्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला लावलेली उपस्थिती आमच्यासाठी सन्मानाची बाब ठरली : बाबूराव चांदेरे (सर कार्यवाह महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन)

यावेळी कबड्डी वाढवण्यासाठी आणि रुजवण्यासाठी “कार्यकर्ता” म्हणून झटलेले प्रा. डॉ. उद्धवराव सोळंके(परभणी), श्री. नेताजी पाटिल(सांगली) यांचा “जेष्ठ कार्यकर्ता” म्हणून, श्री.संजय फडके(अहमदनगर) यांचा “जेष्ठ खेळाडू” म्हणून, श्री. बजरंग परदेशी (नंदुरबार) यांचा “जेष्ठ प्रशिक्षक” म्हणून तर कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार श्री. मोहन भावसार(जळगाव) आणि श्रीमती वासंती बोर्ड(पुणे) यांचा सन्मान करण्यात आला.

तसेच सर्वोत्तम कामगिरी केलेल्या राज्यातील संघांचा, आयोजकांचा, खेळाडूंचा विशेष सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. किशोर/कुमार गटात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होवून राज्याच्या गौरव वाढविलेल्या मुले व मुलींना प्रोत्साहन आणि कौतुकाची थाप म्हणुन शिष्यवृत्ती देण्यात आली.

ऑक्टोबर २०२३ मधे चायना येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या सौ.स्नेहल साखरे, श्री. अस्लम इनामदार, श्री. आकाश शिंदे यांचा देखील गौरव करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आजी माजी खेळाडू उपस्थित होते.